नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा
By Admin | Updated: February 25, 2016 00:28 IST2016-02-25T00:28:32+5:302016-02-25T00:28:32+5:30
नोकरीमध्ये काम करताना खूप बंधने येतात. पण उद्योगामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना वापरता येतात. उद्योगाला किती वेळ द्यायचा, त्याला किती मोठे करायचे, हे तुमच्या हातात असते.

नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
भंडारा : नोकरीमध्ये काम करताना खूप बंधने येतात. पण उद्योगामध्ये तुम्हाला नवनवीन कल्पना वापरता येतात. उद्योगाला किती वेळ द्यायचा, त्याला किती मोठे करायचे, हे तुमच्या हातात असते. म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही नोकरी करण्यापेक्षा उद्योग उभारा आणि उद्योजक बना, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
भंडारा पॅरामेडिकल महाविद्यालयात प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यना ते संबोधित करीत होते. यावेळी रोजगार व स्वयंरोजगार चे सहायक संचालक बालाजी मरे, संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल कुर्वे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, चैताली कुर्वे, यावेळी उपस्थित होते. यावेळी ब्राइडल मेकअप, आणि डी.एम.एल.टी., नर्सिंग या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे फीत कापून उदघाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या देशात कौशल्याची खूप कमतरता आहे. पदविका, पदवी घेतलेल्या तरुणांमध्ये मूलभूत माहिती नसते. आजच्या तरुणांना अनेक क्षेत्रात संधी आहेत. पण यश मिळविण्यासाठी तुमच्यामध्ये समर्पण, निर्धार, शिस्त, आणि सातत्य असले पाहिजे. आज जास्तीत जास्त टॅलेंट हे खेड्यातून येत आहे. त्यामुळे तुम्ही खेड्यातले आहात याबद्दल कमीपणा वाटून घेऊ नका. तुमच्यातल्या ऊर्जेला योग्य मार्ग दाखविल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या यशाचा आवाज जास्त असला पाहिजे, असेही ते विद्यार्थ्यांना म्हणाले. यावेळी बालाजी मरे यांनी प्रास्ताविकातून प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यामधून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि उद्योगासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी बँकांशी समन्वय करुन दिला जातो. जिल्ह्यात कोहिनूर टेकनिकल इन्स्टिट्यूटमध्येसुद्धा मोबाइल दुरुस्ती, कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थांनी अधिक माहितीसाठी रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात संपर्क साधावा. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)