खाजगी व्यापाऱ्यांपासून सावध राहा
By Admin | Updated: October 25, 2016 00:23 IST2016-10-25T00:23:57+5:302016-10-25T00:23:57+5:30
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे त्यांना मिळावे, यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदा दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

खाजगी व्यापाऱ्यांपासून सावध राहा
बाळा काशीवार : दिवाळीपूर्वीच धान खरेदीचा शुभारंभ
साकोली : शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे त्यांना मिळावे, यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदा दिवाळीपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि पैशाच्या लोभात घाईघाईने खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करून त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी केले.
साकोली येथील श्रीराम सहकारी भात गिरणी येथे शासकीय धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भात गिरणीचे अध्यक्ष पतीराम कापगते, संचालक प्राचार्य होमराज कापगते, संचालक महादेव कापगते, अरूण बडोले यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.बाळा काशीवार म्हणाले, दरवर्षी शासकीय धान खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिपावलीसाठी पैशाची चणचण भासत होती. त्यामुळे शेतकरी कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना आपल्याजवळील धान विकत होते. हे खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्यांना शासकीय भावापेक्षा कमी भाव देत होते. कमी भावाच्या धान खरेदीमुळे व्यापाऱ्यांचे फावत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी समाधानात जावी आणि त्यांच्या हितासाठी साकोली येथे आजपासून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या धान खरेदी केंद्राचा प्रत्येकच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार काशीवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)