बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
By Admin | Updated: May 20, 2015 01:19 IST2015-05-20T01:19:37+5:302015-05-20T01:19:37+5:30
शेतकऱ्यांना योग्य उत्तम गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यासाठी १९८३ पासून गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
भंडारा : शेतकऱ्यांना योग्य उत्तम गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यासाठी १९८३ पासून गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत अंमलबजावणी तालुका स्तरावर होत असतांना खरेदीबाबत काही गोष्टीची पडताळणी करुनच निविष्ठा खरेदी करणे आवश्यक आहे. असे कृषि विभागाने कळविले आहे.
परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करीत असताना सिलबंद वेष्टनातील खुणचिठ्ठी असलेले बियाणे खरेदी करावे. वेष्टणात सिलबंद नसलेले बियाणे दर्जाची खात्री नसल्याने ते खरेदी करु नये. छापील किमतीपेक्षा जादा दराने बियाणे खरेदी करु नये. अशी बाब निदर्शनास आल्यास वैद्यमापन शास्त्र विभागाने निदर्शनास आणून द्यावी. विशिष्ट संशोधित वाणाचा आग्रह न धरता त्याच गुणधर्माचे अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे शक्यतो खरेदी करावे.
बियाणे खरेदी केल्यानंतर खरेदीची पावती, वेष्टन व त्यावरील लेबल व पिशवीतील थोडेसे बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.
रासायनिक खते खरेदी करताना परवाना धारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. विक्रेत्यांकडून खरेदी केल्यावर रासायनिक खताचे बिल पावती मागून घ्यावी. खरेदी पावतीवर खताचे नाव, ग्रेड, किंमत, उत्पादकांचे नाव याचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
खत खरेदी करीत असताना खताचे पोत्याच्या वजनाची खात्री करुन घ्यावी. संशयास्पद, बनावट खत विक्री तसेच खताच्या कोणत्याही तक्रारीकरिता नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. किटकनाशके खरेदी करीत असतानाही शेतकऱ्यानी काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)