सावधान! आता बनावट पासधारकांना कोठडी!
By Admin | Updated: March 27, 2015 00:18 IST2015-03-27T00:18:55+5:302015-03-27T00:18:55+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण बनावट ओळखपत्र,

सावधान! आता बनावट पासधारकांना कोठडी!
लोकमत विशेष
प्रशांत देसाई भंडारा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण बनावट ओळखपत्र, प्रमाणपत्र व पासचा वापर करतात. अशा प्रवाशांची आता राज्य परिवहन महामंडळाकडून गय केली जाणार नाही. बनावट कागदपत्रांचा आधार घेणाऱ्या प्रवाशांवर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेऊन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रापमंने घेतला आहे. वेळप्रसंगी अशा आरोपींना कोठडीची हवा खावी लागणार आहे.
नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मागील ७५ वर्षांपासून अविरत सेवा सुरू केली आहे. दरम्यान, रापमंच्या बसेसला पर्यायी व्यवस्था म्हणून अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्स सुरू केल्या आहेत. ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या बसच्या प्रवासाला आजही नागरिकांची पहिली पसंती आहे.
परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता महामंडळाने अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी केली आहे. अनेक चांगल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असतानाच बनावट ओळखपत्र, प्रमाणपत्र व पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या आता दिवसागणिक वाढत चालली आहे. यामुळे रापमंच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम पडत आहे. अशा प्रवाशांवर अंकुश ठेवता यावे, यासाठी रापमंने हा निर्णय घेतला असून तसे आदेश निर्गमित केले आहे.
या आदेशानुसार, शासनाच्या सर्व सवलतींचा गैरफायदा घेऊन बसमधून प्रवास करताना कुणी आढळल्यास त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्य मार्ग परिवहन महामंडळ व शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रवाशांची गय केली जाणार नसल्याने, अशा प्रवाशांनी आता वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना वेळप्रसंगी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे.