लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शस्त्रक्रियेसाठी पैशाची गरज असल्याने बँकेत सोने गहाण ठेवून खात्यात रक्कम घेण्यात आली. मात्र, व्यवस्थापकाने खातेधारकाचे कोरे धनादेश लावून १७ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम पत्नीच्या खात्यावर वळती केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खातेधारकाने पोलिसांकडे धाव घेतली. हा खळबळजनक प्रकार भंडारा येथील मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत उघडकीला आला आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर बँकेचा व्यवस्थापक रोहित दयाराम साहू (रा. पठावाले, खरगापूर, जि. टिकमगढ़, मध्य प्रदेश) हा फरार आहे.
माहितीनुसार, हिमांशू अमित जोशी यांच्या नावाचे भंडारा येथील गांधी चौक स्थित मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत खाते आहे. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी या गोल्ड लोन बँकेमध्ये १९ जुलै २०२५ रोजी तब्बल २९२ ग्राम सोने गहाण ठेवले होते. या बदल्यात हिमांशू यांच्या युको बँकेच्या बचत खात्यात १८ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे हिमांशू यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया महिनाभर लांबली. त्यामुळे गोल्ड लोनची ही रक्कम त्यांच्या खात्यात रक्कम तशीच पडलेली होती.
पैशाची गरज नसल्याने खात्यावर जमा असलेली रक्कम परत करण्यासाठी हिमांशू मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत गेले. बँक व्यवस्थापक रोहित साहू यांनी गोल्ड लोन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी दोन कोरे धनादेश घेतले आणि सध्या सर्व्हर डाऊन आहे, दोन दिवसांत रक्कम खात्यात आल्यावर सोने परत घेऊन जाल, असे सांगितले.
असा केला झोलहिमांशू जोशी यांनी बँक व्यवस्थापक रोहित साहू याला जे दोन कोरे धनादेश दिले होते, त्याआधारे साहू याने त्याच्या पत्नीच्या खात्यावर अनुक्रमे १६ लाख ८१ हजार ८०० व २५ हजार रुपये, असे एकूण १७ लाख ७६ हजार ८०० रुपयांची रक्कम वळती केली. आरटीजीएसच्या सहाय्याने रक्कम वळविल्याचे स्टेटमेंटमध्ये उघडकीस आली आहे.
सोने ठेवले अन्य बँकेतहिमांशू जोशी यांनी मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत सोने गहाण ठेवले होते. मात्र, व्यवस्थापक साहू याने त्या सोन्यापैकी ३४ ग्राम सोने मनप्पुरममधून काढून अन्य बँकेत स्वतःच्या नावाने गहाण ठेवल्याचाही प्रकार उघडकीला आला.
तो म्हणतो, मी माझी लाइफ सेट केलीहिमांशूच्या वडिलांनी रोहित साहू याला फोन केला असता त्याने, मी माझी लाइफ सेट केली आहे. पैसे देणार नाही, असे उत्तर दिल्याचे अमीत जोशी यांनी सांगितले.
२९२ ग्रॅम सोने बँकेत गहाण ठेवण्यात आले होते.आठ दिवसांचा कालावधी लोटुनही मनप्पुरम गोल्ड लोन बैंक व्यवस्थापनाने याप्रकरणी खातेधारकाला हवी तशी मदत केली नाही.
"या फसवणूक प्रकरणाबाबत तक्रार पोलिस ठाण्यात आली आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. योग्य ती कारवाई केली जाईल."- उल्हास भुसारी, पोलिस निरीक्षक, भंडारा.
"बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत माहिती वरिष्ठांना कळविली आहे. खातेधारक असलेले हिमांशू जोशी यांना बँकेतर्फे आवश्यक ते सहकार्य केले जाईल. साहू याला मोबाइलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते प्रतिसाद देत नाही. खातेधारकाने पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे."- सुमित सोनटक्के, प्र. बँक व्यवस्थापक, मनप्पुरम गोल्ड लोन बैंक, भंडारा.