बेटाळा नदीपात्रातील रेतीचा उपसा
By Admin | Updated: July 26, 2014 23:57 IST2014-07-26T23:57:36+5:302014-07-26T23:57:36+5:30
मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील नदीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. रात्री येथून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याला महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असून

बेटाळा नदीपात्रातील रेतीचा उपसा
भंडारा : मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील नदीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. रात्री येथून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. याला महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असून यावर निर्बंध घालावा, अशी मागणी रामेश्वर राऊत यांनी केली आहे.
बेटाळा येथील नदीघाटात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा आहे. मागील काही दिवसांपासून येथून रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने यावेळी नदीत पाणी येत असल्याने रेतीचा उपसा करता येत नाही. त्यामुळे रेतीचे साठे नदीघाटाजवळ करून ठेवण्यात आले. तक्रारीवरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ७०० ब्रास रेतीचा साठा असताना त्यांच्याकडून मात्र १५० ब्रास रेतीसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. लिलाव घेणाऱ्यांकडून सदर रेतीची उचल करण्यात येत आहे. मात्र १५० ब्रास व्यतिरिक्त उर्वरित रेतींचीही उचल सदर ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यात महसूल विभागाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
नदीघाटातून बिना वाहतूक परवान्यासह रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर आळा बसावा व शासनाचे नुकसान होवू नये याकरीता रात्रीची वाहतूक बंद करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)