शिक्षणाच्या पायाभूतचा ‘पायाच’ डगमगला
By Admin | Updated: October 8, 2015 00:21 IST2015-10-08T00:21:32+5:302015-10-08T00:21:32+5:30
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले.

शिक्षणाच्या पायाभूतचा ‘पायाच’ डगमगला
लोकमत विशेष
प्रशांत देसाई भंडारा
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले. मात्र, सप्टेंबर महिना लोटूनही जिल्ह्यातील या पायाभूत चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे, सरलच्या कामात शिक्षक, निवडणुकांचे बीएलओ, शालार्थ अशा अनेक कामांत शिक्षकांना लावल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती थंडावली आहे. शिक्षण विभागाने पायाभूतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्या त्यांचा पायाच डगमगल्याने ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणण्याचा प्रसंग पालकांवर ओढवला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून नाविण्य उपक्रम सुरू करण्यात आले.
बालभारतीच्या सहकार्यातून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधता यावी, यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने, यावर्षीपासून शिक्षण विभागाने मागीलवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे ठरविले.
ही चाचणी वर्षातून तीनवेळा घ्यायची आहे. पहिल्याच चाचणीला आॅक्टोबर महिना सुरु झाला असतानाही आणखी दोन चाचण्या केव्हा घेणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
महिनाभरावर दिवाळी आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची प्रथम सत्र परीक्षाही दिवाळीपूर्वी होणे आवश्यक आहे.
अशातच शिक्षण विभागाच्या सरल, शालार्थ प्रणालीच्या कामात शिक्षक शाळेत न राहता, माहिती अद्ययावत करण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. अगोदरच जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातल्या त्यात, जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना बीएलओची कामे सोपविण्यात येणार आहे. आरटीई कायद्याचा घोळ या बाबींमुळे शिक्षक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर चालला आहे. परिणामी त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.