जनतेचा ‘आधार’ कचऱ्यात
By Admin | Updated: June 16, 2015 00:35 IST2015-06-16T00:35:50+5:302015-06-16T00:35:50+5:30
येथील गौतम वॉर्डातील बौद्ध विहाराच्या बाजुला हजारो आधारकार्ड बेवारस स्थितीत पडून असल्याचे आढळून आले.

जनतेचा ‘आधार’ कचऱ्यात
पवनीतील प्रकार
गौतम वॉर्ड परिसरात आढळले हजारो बेवारस आधारकार्ड
पवनी : येथील गौतम वॉर्डातील बौद्ध विहाराच्या बाजुला हजारो आधारकार्ड बेवारस स्थितीत पडून असल्याचे आढळून आले. याची चौकशी करून डाक विभागाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
केंद्र शासनाने मागील दोन वर्षापासून जनतेला आधार कार्ड काढण्याची सक्ती केली असून शासनाच्या विविध योजनाकरीता आधारकार्डची मागणी केली जात आहे. मग ते बँकेचे खाते उघडताना असो किंवा स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलण्याचे काम असो. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड मागितला जातो. याकरीता शासनाने गावागावांत आधारकार्ड काढण्याची मोहीम राबवून आधारकार्ड काढून घेतले. परंतु, दोन वर्ष लोटूनही अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही. परिणामी आधारकार्ड मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट सुरू आहे.
नागरिकांनी काढलेले आधारकार्ड हे बंगलोर, मद्रास येथे बनत असल्याची माहिती असून बनलेले आधारकार्ड पोष्टाद्वारे जनतेच्या पत्त्यावर पाठविले जात आहेत. परंतु, पोष्टातील कर्मचारी आधारकार्ड वाटपात गलथानपणा करीत असून पवनी येथील आधारकार्ड वाटपाची जबाबदारी डाक विभागाने रोजंदारी मजुरांवर सोपविली होती. हे आधार कार्ड त्यानेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
गौतम वॉर्डातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले आधारकार्ड हे हजारोच्या संख्येत असून हे कार्ड मागील दोन महिन्यापासून येथे पडून असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये कुजबूज असून अनेकांनी ओळखीच्या लोकांचे कार्ड उचलून नेल्याची माहिती आहे. गौतम वॉर्ड परिसरात आढळून आलेले आधारकार्ड कुणी फेकले? व का फेकले याचा शोध घेणे गरजेचे असून मिळालेले आधार कार्डव्यतिरिक्त किती कार्ड फेकले याचा शोध घेणे गरजेचे आहे. ज्यांनी यापूर्वी आधार कार्ड काढले आहेत. मात्र त्यांचेकडे आधारकार्ड अजूनपर्यंत पोहचले नाहीत अशांना आधारकार्ड मिळवून देण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणात दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी. ज्यांनी आधारकार्ड काढले आहेत परंतु त्यांना कार्ड मिळाले नाहीत त्यांचे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था विभागाने करावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
हा प्रकार आमच्या लक्षात येताच आम्ही सर्व आधारकार्ड डाक विभागात आणले. काही आधारकार्ड ओले झाले असले तरी पत्ता दिसून आलेले कार्ड वाटप करण्यात येणार आहे. पवनी डाकघरात पोस्टमन नाही. त्यामुळे हे काम कंत्राटी मजुराला दिले होते. त्यानेसुद्धा हे काम सोडलेले आहे. याची वरिष्ठांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. यासाठी दोषी असलेल्या कंत्राटी मजुरांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- एम.व्ही. निखार,
सहायक अधीक्षक,
डाकविभाग पवनी.