पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा
By Admin | Updated: December 2, 2014 22:59 IST2014-12-02T22:59:05+5:302014-12-02T22:59:05+5:30
एकेकाळी शांतता आणि एकोपा जपणारे शहर म्हणून नावारुपाला आलेले भंडारा शहर आता गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र ठरले आहे. गांजा सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत

पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा
पोलिसांचे ‘व्हिजीट बुक’ ठरले शो पीस
भंडारा : एकेकाळी शांतता आणि एकोपा जपणारे शहर म्हणून नावारुपाला आलेले भंडारा शहर आता गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र ठरले आहे. गांजा सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तर या नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरुणांचे शरीर ऐन तरुणपणात मरतकुडे झाले आहे.
शहरातील सामान्य रुग्णालयाकडे जाणारा बसस्थानक परिसर, लायब्ररी चौकातील पालिकेचा बगिचा परिसर जे.एम. पटेल महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील ओसाड बगिचा, राजीव गांधी चौक आणि टप्पा मोहल्ला परिसरात प्रमाणात गांजाची विक्री होते. परंतु, गांजाची सर्वाधिक विक्री बसस्थानकाच्या मागील परिसरातील नगर पालिकेच्या निर्माणाधीन चाळीत सुरू आहे. त्यामुळे गांजा विक्रीच्या या परिसराला संवेदनशील ठरवून भंडारा पोलिसांनी त्याठिकाणी फिरते पोलीस पथक तैनात केले आहे. या पथकाला परिसरात भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येकजण आपली ‘ड्युटी’ चोखपणे बजावतात की नाही, यासाठी एका दुकानात ‘व्हिजीट बुक’ ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे ‘ड्युटी’वर असलेल्या पोलिसांना दर तासाला त्या परिसरात फेरफटका मारणे अनिवार्य आहे. गस्त करताना काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत एकालाही पकडण्यात आलेले नाही. कुंपन जिथे शेत खाते तेव्हा... गुन्हेगारांना पकडणार तरी कोण? असा सवाल त्या परिसरातील दुकानदारांचा आहे.
‘ड्युटी’वर असलेले पोलीस दरतासाला नियमित हजेरी लावतात खरे. परंतु कुठेही फेरफटका न मारता ‘व्हिजीट बुक’वर ‘या परिसरात शांतता आहे’, असे लिहून मोकळे होतात. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून नित्यनेमाने सुरू असून हे ‘व्हिजीट बुक’ केवळ सही करण्यापुरते शोभेचे ठरले आहे. ‘लोकमत’ चमूने याठिकाणी सुमारे तास ठाण मांडून ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता या ठिकाणी विकण्यात येणारा गांजा आणि पोलिसांची कर्तव्यशून्यता उघडकीस आली. या चार तासांच्या अवधीमध्ये दुपारी २ वाजता महिला चालक असलेले फिरते वाहन आले. त्यातून दोन महिला पोलीस उतरल्या. खुंटीला टांगून असलेल्या ‘व्हीजीट बुक’मध्ये ‘परिसरात शांतता आहे’, असे लिहून निघून गेल्या. त्यानंतर पोलीस गणवेशातील एक पोलीस कर्मचारी दुचाकीने आले, त्यांनीही खुंटीवरच्या ‘व्हीजीट बुक’मध्ये परिसरात शांतता आहे, असे लिहून निघून गेले. असा प्रकार प्रत्येक तासानंतर सुरू राहिला. त्यानंतर ‘लोकमत’ चमूने याबद्दल परिसरातील दुकानदारांना बोलते केले असता ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून या परिसरात गांजा विकला जातो. त्यांची दहशत आहे. या परिसरात खासगी प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या आॅटो, जीपमध्ये बसून हे तस्कर गांजाची विक्री करतात. आॅटोमध्ये बसू नका, असे एखाद्याने चालकाने हटकले तर त्यांच्याशी हमरीतुमरी करीत असल्याचे वाहनचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हा प्रकार इतक्या दिवसांपासून सुरु असतानाही पोलीस येतात आणि काय करतात, हेच आम्हाला कळत नसल्याचेही त्यांचे म्हणने आहे. काहींनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले की, पोलिसांना सर्व काही माहित आहे, परंतु तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांचे कोण बिघडविणार? उद्या छापून येईल. परवा पुन्हा जैसे थे’ स्थिती राहील, असे सांगून जोपर्यंत ‘कर्तव्यदक्ष’ पोलीस अधिकारी जिल्ह्यात येणार नाहीत, तोपर्यंत हा प्रकार असाच सुरू राहील, असे सांगून त्या व्यावसायिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला.
(लोकमत चमू)