तंटामुक्त गाव मोहिमेत दारू ठरतेय अडसर
By Admin | Updated: July 15, 2015 00:41 IST2015-07-15T00:41:57+5:302015-07-15T00:41:57+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे.

तंटामुक्त गाव मोहिमेत दारू ठरतेय अडसर
दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार : पोलीस यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष
भंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गावांतील क्षुल्लक कारणातून होणारे तंटे संपुष्टात येऊन गावाला शांततेकडून समृद्धीकडे नेता यावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शासन तंटामुक्त गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार देते. पण जिल्ह्यातील काही ठिकाणी वाहते दारूचे पाट या योजनेला अडसर ठरताना दिसतात. मद्यपिंच्या उच्छादाने तंटामुक्त समित्या हतबल झाल्यात. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिळावे म्हणून राज्य शासनाच्या गृह खात्याने १५ आॅगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या कार्यात पोलिसांचे सहकार्य अनिवार्य केले. पोलीस प्रशासनातील उणीवाही तंटामुक्त गाव मोहिमेचे काम पूढे नेण्यास मारक ठरताना दिसतात. पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यावर वा उणीव दूर केल्यास तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना यशस्वी ठरणार आहे. ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारी दारू ही या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण निर्माण करीत आहे. भंडारा जिल्हयात दारूबंदी नाही. गावोगावी मद्यपिंचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊन फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहेत. असे असताना शासन स्तरावर दारूबंदीवर कठोर अंमलाकरिता प्रयत्न होताना दिसत नाही. काही ठिकाणी महिला, युवकांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. पण पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळत नसल्याने दारूविक्री अव्याहत सुरू आहे. परिणामी तंटे वाढून वातावरण खराब होताना दिसते. राज्य शासनाकडून २00७ पासून तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यात आजपर्यंत अनेक गावांत तंटामुक्त गाव समितीकडून चांगले कामही झाले; पण अनेक गावांत मद्यपिंमुळे भांडणे वाढताना दिसतात. दारूमुळे भांडणे सोडविताना अडसर निर्माण करीत असल्याचे दिसते. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे मानसिकतेत बदल होत असून कुरापतीचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारामुळे गावातील भांडणे तंटामुक्त गाव समितीला सोडविणे कठीण होते आणि शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. यामुळे समितीच्या कार्याला अपयश येते. यासाठी गावांतून दारू हद्दपार करणेच गरजेचे झाले आहे. पोलिसांचे सहकार्यही गरजेचे
गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना पोलिसांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे; पण तेच मदत करीत नसतील तर तंटे सुटणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय दारूबंदी महिला मंडळांनाही पोलिसांनी मदत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)