बापूसाहेबांचे जीवन समर्पित कार्यकर्त्यासारखे
By Admin | Updated: January 24, 2016 00:39 IST2016-01-24T00:39:32+5:302016-01-24T00:39:32+5:30
सन १९७३-७४ मध्ये महाविद्यालयीन जीवनात विाद्यार्थी परिषदेचे कार्य करीत असताना भंडारा, लाखनी येथे येत होतो.

बापूसाहेबांचे जीवन समर्पित कार्यकर्त्यासारखे
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी वर्षाचा समारोप
चंदन मोटघरे लाखनी
सन १९७३-७४ मध्ये महाविद्यालयीन जीवनात विाद्यार्थी परिषदेचे कार्य करीत असताना भंडारा, लाखनी येथे येत होतो. तेव्हा बापूसाहेबांचे कार्य जवळून बघण्याची संधी मिळाली. सत्ता, पैसा, ताकद नव्हती त्या काळात बापूसाहेबांनी शिक्षणाचा प्रसार केला. बापूसाहेबांचे जीवन समर्पित होते. शाळा मोठ्या करण्यासाठी स्वार्थाचा विचार न करता पत्नीचे दागिने विकले, शेती विकली व संस्थेची उभारणी केली. बापूसाहेबांचे जीवन समर्पित कार्यकर्त्यासारखे होते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्थानिक समर्थ विद्यालयात शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळा व समर्थ विद्यालयाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, आमदार राजेश काशिवार, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार संजय पुराम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, डॉ.प्रकाश मालगावे, संस्थेचे आल्हाद भांडारकर, मु.के. भांडारकर, न.ता. फरांडे, मधू लाड उपस्थित होते.
यावेळी ना. गडकरी म्हणाले, बापूसाहेब प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे व्यक्तीमत्व होते. जेव्हा भाजपाची सत्ता नव्हती, मानसन्मान नव्हता, तेव्हा बापूसाहेबांनी संघ कार्यकर्त्यांची भूमिका पार पाडली. अपमान सहन केला. आज दिवस पालटले आहेत. व्यवसायाभिमुख व ज्ञान देणारे शिक्षण महत्वाचे आहे. सध्या ग्रामीण भागाची स्थिती भयावह आहे. शेतकरी संकटात आहे. धानपिकाला बाजारात भाव नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. वीज, पेट्रोल, प्लॉस्टीक तयार केला पाहिजे.
बापूसाहेब लाखनीकर यांनी लाखोरी डाळीवरील बंदी हटविण्यासाठी प्रयत्न केले. भारत सरकारने लाखोरी डाळीवरील बंदी हटविली आहे. बापूसाहेबांनी स्वत:पेक्षा राष्ट्र, समाज मोठा मानला. त्यांचा त्याग, तपस्या, बलिदान न विसरण्यासारखे आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, गुणवत्ता याकडे लक्ष देऊन आर्थिक प्रगती साधता येते. सुखी, संपन्न हिंदुस्थानची संकल्पना पूर्णत्वास आणायची आहे. पहिले सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन बापूसाहेब लाखनीकर यांनी केलेले कार्य कायम पुढे नेत राहावे असे आवाहन करून मतभेद विसरण्याचा सल्ला दिला. ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करता येते. आज माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञानाला मोठ्या संधी आहेत. असेही गडकरींनी सांगितले.
याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते बापूसाहेब गौरव ग्रंथ व स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक आल्हाद भांडारकर यांनी केले. स्वागताध्यक्ष खासदार नाना पटोले म्हणाले, बापूसाहेबांनी लाखनीला शिक्षणाचे माहेरघर करून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. आभारप्र्रदर्शन प्राचार्य प्रमोद धार्मिक यांनी केले.