जांभोऱ्यातील दुसऱ्याही दुकानाचा परवाना रद्द
By Admin | Updated: January 24, 2015 00:19 IST2015-01-24T00:19:00+5:302015-01-24T00:19:00+5:30
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील रेशन गैरव्यवहार प्रकरणात अन्न पुरवठा विभागाने मुंगूसमारे यांचे दुकान निलंबित केले होते.

जांभोऱ्यातील दुसऱ्याही दुकानाचा परवाना रद्द
लोकमतचा दणका
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील रेशन गैरव्यवहार प्रकरणात अन्न पुरवठा विभागाने मुंगूसमारे यांचे दुकान निलंबित केले होते. मात्र दुसऱ्या बचत गटाच्या दुकानातही गैरप्रकार असताना कारवाई करण्यास विलंब केला. प्रकरणी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच दुसरे दुकानही निलंबित करण्यात आले.
जांभोरा येथील राशन दुकानदारांकडून धान्याची अफरातफर होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. प्रकरणी जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशीचे निर्देश दिले होेते. तहसीलदार मोहाडी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार मोटघरे दुकानदारांकडे गेले असता दुकानदारांनी असभ्य वर्तणुकी करून मारण्यासाठी काठी उचलली.
चौकशीअंती अहवाल तहसीलदारांमार्फत जिल्हा अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पाठविला गेला. अधिकाऱ्यांनी संबंधिताचे बयान नोंदवून घेत दोष सिद्ध झाल्याने मुंगुसमारे यांचे राशन दुकान निलंबित केले. एका दुकानावर कारवाई झाली मात्र दुसऱ्या दुकानावर का नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्याने नागरिकांत विभागाप्रती असंतोषांची भावना होती. दुसऱ्या दुकानात मोठे घबाड असताना अभय तर दिले जात नाही, अशी शंका घेतली गेली. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केले. बचत गटाच्या प्रमुखांच्या बयानांची नोंद केली गेली. तहसिलदारांचा अहवाल व बयान यातून दोष सिद्ध झाल्याने अखेर दुकानाच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले. दोन्ही दुकान एकाचवेळी निलंबित होण्याची पहिली घटना जांभोरा येथे घडली. (वार्ताहर)