साहित्य विकणाऱ्यांना तुमसरात बंदी
By Admin | Updated: October 18, 2015 00:08 IST2015-10-18T00:08:19+5:302015-10-18T00:08:19+5:30
तुमसरातील घरफोडीच्या सत्रामुळे घरोघरी फिरून घरगुती साहित्य विकणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी तुमसर...

साहित्य विकणाऱ्यांना तुमसरात बंदी
शनिवारची घटना : घरफोड्याशी संबंधाचा संशय, वाहतूक पोलिसांची कारवाई
तुमसर : तुमसरातील घरफोडीच्या सत्रामुळे घरोघरी फिरून घरगुती साहित्य विकणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी तुमसर बसस्थानकातून नागपुरला परत पाठविले. मागील दीड महिन्यापूर्वी साहित्य विकणाऱ्या महिला टोळींचा घरफोडीशी संबंध असल्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली.
शनिवारी सकाळच्या सुमारास तुमसर शहरात चार ते पाच महिला साहित्य विकतानी तुमसर वाहतूक पोलिसांना दिसल्या. त्यांच्यासोबत लहान मुलेही कडेवर होती. एक महिन्यापूर्वी घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यात महिला टोळीचा संबंध पोलिसांना दिसून आला.
सकाळी ही महिला टोळी शहरात फिरुन घरांची माहिती जमा करण्याचे काम करीत होती. रात्री या टोळीशी पुरुषांची टोळी चोरी करायची. त्यामुळे कोणते घर कुलुपबंद आहेत, याची माहिती ही महिला टोळी त्यांना द्यायची. घरगुती साहित्य विकणाऱ्या चार महिला नागपूर येथील होत्या. त्यांना वाहतूक पोलिसांनी विचारणा केली. खबरदारी साठी वाहतूक पोलिसांनी कारवाई न करता त्या महिलांना तिकीट काढून नागपूरला रवाना केले.
यासंदर्भात वाहतूक पोलीस धावडे यांनी शहरातील चोरीच्या सत्राचा हवाला दिला. शनिवारी शहरात फिरणाऱ्या व्यवसायानिमित्त आलेल्या महिलांची पार्श्वभूमी पोलिसांना नव्हती. त्यामुळे शंकेच्या आधारावरुन त्यांना नागपूर येथे परत पाठविण्यात आले. वाहतूक पोलिसांना स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या तथा सूचना केल्या असाव्यात. अधिक माहितीकरिता पोलीस निरीक्षक किशोर गवई यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)