बँकांची सुरक्षा व्यवस्था तोकडी
By Admin | Updated: December 23, 2014 22:57 IST2014-12-23T22:57:57+5:302014-12-23T22:57:57+5:30
तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बॅका व पतसंस्था आहेत. या बँक व पतसंस्थांमधून दररोज कोट्यवधींची देवाण घेवाण होते. मात्र रात्री सुरक्षेसाठी काही बँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नाही.

बँकांची सुरक्षा व्यवस्था तोकडी
संजय साठवणे - साकोली
तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बॅका व पतसंस्था आहेत. या बँक व पतसंस्थांमधून दररोज कोट्यवधींची देवाण घेवाण होते. मात्र रात्री सुरक्षेसाठी काही बँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नाही. त्यामुळे या बँकांची सुरक्षा रामभरोसे आहे. मागील आठवड्यात एकोडी येथील स्टेट बँकेच्या एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या आरोपींचा शोध लागलेला नाही.
साकोली तालुक्यात १२ राष्ट्रीयकृत बँका
साकोली तालुक्यात बारा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाच बँका व सात पतसंस्था आहेत. या सर्व बँका व पतसंस्थामधून दररोज लाखो करोडो रुपयाची देवाण घेवाण होत असून हजारो ग्राहक या बँक व पतसंस्थेत कामानिमित्त येतात.
या बँकांमध्ये रोख, सोने असा किमती ऐवज ठेवला असतो. दिवसेंदिवस गुंडगिरी प्रवृत्ती वाढत आहे. सोबतच चोरीच्या घटनाही वाढत आहेत. यादृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे सुरेक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बँकांना व पतसंस्थांना सुरक्षा रक्षकांसह सीसीटीव्ही लावण्यासंबंधी सांगण्यात येत आले असले तरी बोटावर मोजण्याइतपत बँकांनीच याची अंमलबजावणी केली आहे. उर्वरीत बँका किंवा पतसंस्थांत सुरक्षा गार्ड व सीसीटीव्ही अजूनपर्यंत लावली नाही. त्यामुळे रात्रीची सुरक्षा पोलिसांनाच करावी लागते.