नदीकाठावर हुंदके अन् आक्रोश
By Admin | Updated: October 5, 2014 22:59 IST2014-10-05T22:59:42+5:302014-10-05T22:59:42+5:30
कोदुर्ली वैनगंगा नदी घाटावरील कालची रात्र तिघांसाठी काळरात्र ठरली. दुर्गामातेच्या मिरवणुकीत सहभागी होऊन विसर्जनाअंती तिघा जणांचा करुण अंत झाला. डोळ्यासमोर गेलेले प्राण सर्वांच्याच हृदयाला वेदना

नदीकाठावर हुंदके अन् आक्रोश
काळरात्र : कोदुर्ली गावात शोककळा
लक्ष्मीकांत तागडे - गोसे बुज.
कोदुर्ली वैनगंगा नदी घाटावरील कालची रात्र तिघांसाठी काळरात्र ठरली. दुर्गामातेच्या मिरवणुकीत सहभागी होऊन विसर्जनाअंती तिघा जणांचा करुण अंत झाला. डोळ्यासमोर गेलेले प्राण सर्वांच्याच हृदयाला वेदना देणारे ठरले. सकाळ उजाडताच नदीकाठावर फक्त हुंदके आणि हुंदक्यांचाच आवाज गुंजत होता.
पवनीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या कोदुर्ली येथे दुर्गामातेच्या विसर्जन प्रसंगी तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. उमेश सोनकुसरे, मोहीत काटेखाये हे दोघे तरुण यांच्यासह पंढरी निखारे या ५० वर्षीय गृहस्थाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली. तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र या तिघांच्या नशीबी आजचा सूर्योदय लिहिलेला नसावा असेच म्हणावे लागेल. आज सकाळी मृतदेह शोधण्याच्या कामाला प्रारंभ होताच कोदुर्ली गावासह परिसरातील गावातील नागरिकांनी नदीपात्रात एकच गर्दी केली होती.
सोनकुसरे, निखारे व काटेखाये या कुटुंबियांच्या नातेवाईकांना दु:खाचा पारावार उरला नाही. दु:खाचे डोंगर जणू त्यांच्यावर कोसळले. डोळ्यादेखत तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. हंबरडा फोडून रडणारे नातेवाईक, हुंदक्यांचा आवाज हे सर्वच दृष्य मनाला हेलावून सोडणारे होते. तरुणांच्या जीवनाबाबत सोनेरी स्वप्न बघितलेल्या त्यांच्या कुटुंबियावर काळाचा हा आघात कधीही न भरून निघणारा आहे.