बंगळुरुच्या वैज्ञानिकांनी घेतली कीटकजन्य आजारावर कार्यशाळा
By Admin | Updated: August 12, 2015 00:34 IST2015-08-12T00:34:04+5:302015-08-12T00:34:04+5:30
मानवाच्या चुकांमुळे वातावरण दूषित होऊन मानव स्वत:चे आरोग्य धोक्यात आणत आहे.

बंगळुरुच्या वैज्ञानिकांनी घेतली कीटकजन्य आजारावर कार्यशाळा
दोन रुग्णालयाची पाहणी : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
साकोली : मानवाच्या चुकांमुळे वातावरण दूषित होऊन मानव स्वत:चे आरोग्य धोक्यात आणत आहे. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना सूचना देऊन जनजागृती करुन कीटकजन्य आजार कशामुळे वातावरणात पसरत असतो, त्यासाठी काय उपायायोजना कराव्यात, परिसर स्वच्छ कसे ठेवावे यासह अनेक उपाययोजनाविषयी माहिती दिली जाते. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करुन आपल्याच आरोग्याशी खेळ करताना दिसतात.
विषाणूंपासून होणारे डेंग्यू, चिकनगुनिया, जपानी ज्वर, स्वाईन फ्ल्यू, दबोका यासारख्या असाध्य रोगांवर आपण औषधांच्या उपयोगातून मात केली तरी हे आजार गंभीर आजार आहेत असे मत डॉ. सी. जी. राऊत, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी बंगळुरु यांनी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे कीटकजन्य आजारावर आयोजित कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी सभापती धनपाल उंदीरवाडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश बडवाईक, डॉ. भास्कर गायधने, डॉ. दीपक चंदवाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे उपस्थित होते.
या कार्यशाळेत वैज्ञानिक डॉ. राऊत यांनी कीटकजन्य आजारापासून बचाव कसा करता येईल तसे हे आजार जडल्यास डॉक्टरांनी सुध्दा उपचार कशा पध्दतीने करावेत यावरही विस्तृत माहिती दिली. यावेळी डॉ. राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी व उपजिल्हा रुग्णालय साकोलीची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रुपेश बडवाईक यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भास्कर गायधने यांनी मानले. कार्यशाळेला डॉ. निखारे, डॉ. आर. डी. कापगते, डॉ. वाय. एस. कापगते, डॉ. थोटे तसेच आरोग्य सेवक, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)