तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घाला
By Admin | Updated: February 20, 2015 00:34 IST2015-02-20T00:34:19+5:302015-02-20T00:34:19+5:30
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घाला
भंडारा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे. उशिरा का असेना शासनाला जाग आली. आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी तंबाखूमुक्तीसंदर्भात मोहीम राबविण्याची तयारी सुरु केली आहे. तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहचत असतानाही, कित्येक जीव यमलोकी गेल्यावरही तंबाखूचे सेवन आजही मोठ्या प्रमाणात केले जाते. तंबाखू, गुटखा, पानमसाला, नस या सर्वांचा वापरामुळे मानवी शरीराला धोका असताना व ती बाब माहित असतानाही ते कृत्य वारंवार केले जात असल्यामुळे तंबाखू सेवन ही एक मनोविकृती आहे. त्यामुळे तंबाखू बंदी झालीच पाहिजे, या राज्य शासनाच्या भूमिकेला शहरातील नामवंत डॉक्टरांनी लोकमतच्या चर्चासत्रातून शंभर टक्के पाठींबा दिला.
तंबाखू हे हृदयासाठी विष
तंबाखूचा सर्वात पहिला परिणाम हा मानवी हृदयाला होत असतो. तंबाखू हे मानवी हृदयासाठी विष आहे. दारू व तंबाखू सेवन करणाऱ्या इसमांना हे तर अत्यंत घातक आहे. तोंडाचा, पोटाचा व अन्ननलिकेचा कर्करोग तंबाखूमुळे होत असतो. तसेच अन्य आजारही या एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे होत असते. तंबाखू मुक्ती झाली तर आपोआप हृदयाचे आजार कमी होतील.
-डॉ. नितीन तुरस्कर
जनरल फिजीशियन
तंबाखूचे सेवन म्हणजे शरीरासाठी धोक्याची सूचना
तंबाखुच्या सेवनामुळे मुख रोगाचा कर्करोग होतो. हळूहळू तो पसरून फुफफुस व पोटाच्या कॅन्सरलाही कारणीभूत ठरतो. दुसरीकडे सिगारेट, विडी यापासून निघणाऱ्या धुरामुळे 'एलर्जीक प्राब्लेम' निर्माण होतात. त्यामुळे तंबाखुचे सेवन हे शरीरासाठी धोक्याची सूचना आहे. तंबाखू बंदी झालीच पाहिजे. तंबाखूमुळे मृत्यू होत असताना नागरिकही जागरुक का होत नाही यावरही विचारमंथन होणे गरजेचे आहे.
-डॉ. मनोज चव्हाण
हृदयरोग तज्ज्ञ
दर दिवसाला आढळतो एक कर्करूग्ण
माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी तपासाअंती एकाला तरी कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. एकट्या तंबाखू सेवनाचा हा दुष्परिणाम आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. गुटखा खाणे हे ‘कॉमन’ झाल्याने कर्करोगाचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहे. तंबाखू बंदीची घोषणा फार पुर्वीच व्हायला हवी होती. उशिरा का असेना शासनाने आगामी दिवसात तंबाखू मुक्तीची आखलेली मोहिम शंभर टक्के यशस्वी झालीच पाहिजे.
-डॉ. प्रमोद धुर्वे
कान, नाक, घसा तज्ज्ञ
तंबाखू बंदी झालीच पाहिजे
राज्य शासनाने तंबाखू बंदीसंदर्भात भविष्यकालीन कायदा अंमलात आणण्यासंदर्भात जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. तंबाखूवर बंदी आणलीच पाहिजे, तंबाखू, सिगारेट, नस व आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे व समाजात जनजागृती करणे यासाठी २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे. इंडियन डेंटल असोसिएशनच्या जवळपास आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या मोहिमेला आपला पाठिंबा दिला आहे. ज्या तंबाखुच्या सेवनाने शरीराला इजा होते त्यावर बंदी आणलीच पाहिजे.
-डॉ. मनिष बत्रा
दंत रोग तज्ज्ञ
तंबाखुमुळे हाडे होतात ठिसूळ
तंबाखुमध्ये निकोटीन हा पदार्थ असल्यामुळे शरीराला त्याची गरज भासत जाते. परिणामी मानसीक दृष्ट्या संबंधित इसम दिवसेंगणिक तंबाखुचे सेवन करतच जातो. कर्करोग तर होतोच मात्र शरीरातील हाडेही ठिसूळ होत जातात. ही बाब फार उशिरा लक्षात येते. तोपर्यंत तंबाखू सेवन करणारा मृत्युच्या उंबरठ्यावर असतो. त्यामुळे तंबाखू आणि दारूच्या सेवनावर बंदी झाली पाहिजे.
-डॉ. गोपाल व्यास
अस्थिरोग तज्ज्ञ
सवय बदलने गरजेचे
तंबाखूचे सेवन ही एक सवय आहे. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे तंबाखुचे सेवन नियमित करावे, अशी सवय त्या इसमाला लागलेली असते. यासाठी स्वत:हून बदल घडविणे गरजेचे आहे. जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तंबाखू सेवनाची सवय बंद होवू शकते. या मोहिमेला घरापासूनच सुरूवात करावी लागेल.
-डॉ. मिलिंद देशकर
अस्थिरोग तज्ज्ञ
आई-वडिलांची जबाबदारी अत्यंत महत्वाची
लहान मुलेही जेव्हा गुटख्यामधील सुपारी मागतात, तेव्हा तंबाखुचे सेवन या स्तरापर्यंत येवून पोहचले आहे, याचे गांभीर्य कळते. लहान मुलेही गुटखा खात असल्याने त्यांना एॅसिडीटी, अल्सर व आतड्यांवर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण जाणवते. दिवसेंगणिक या प्रकाराचे रुग्णही एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे आढळून येत आहेत. यासाठी आई-वडिलांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. तंबाखू मुक्तीच झालीच पाहिजे याचा मनापासून निर्धार करणे महत्वाचे असून याची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे.
-डॉ. पराग डहाके.
बालरोग तज्ज्ञ
शरीराच्या सर्वांगीण विकासावर विपरित परिणाम
तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात. प्राथमिक अवस्थेत कर्करोग आहे किंवा नाही याचे निदानच होत नाही. निदान झाल्यावर खूप उशिर झालेला असतो. ज्या तंबाखूच्या सेवनामुळे माणसाला जीवन गमवावे लागते, तरीही त्याचे सेवन करणे बंद होत नाही. ही खरच लाजीरवाणी गोष्ट आहे. दुसरीकडे तंबाखूच्या सेवनामुळे शरीराचा सर्वांगीण विकास खोळंबत असतो. यावर जनजागृती झालीच पाहिजे.
- डॉ.यशवंत लांजेवार
बालरोग तज्ज्ञ