बेटाळा घाटातून रेतीचा खुलेआम उपसा महसूल धोक्यात
By Admin | Updated: May 8, 2014 23:30 IST2014-05-08T23:30:28+5:302014-05-08T23:30:28+5:30
मोहाडी : तालुक्यातील २४ रेती घाटांपैकी यावर्षी ४ रेती घाटाचे लिलाव झाले आहेत. चार रेती घाटांपासून शासनाला ६० लाख ७८ हजार ४४९ रुपये महसूल प्राप्त झाला

बेटाळा घाटातून रेतीचा खुलेआम उपसा महसूल धोक्यात
पहाटेपासून रात्रीपर्यंत रेतीची वाहतूक, महसूल व पोलिसांचा कानाडोळा
मोहाडी : तालुक्यातील २४ रेती घाटांपैकी यावर्षी ४ रेती घाटाचे लिलाव झाले आहेत. चार रेती घाटांपासून शासनाला ६० लाख ७८ हजार ४४९ रुपये महसूल प्राप्त झाला असला तरी अन्य घाटांचा लिलाव न झाल्यामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मागीलवर्षी बेटाळा (ब) हा एकच रेतीघाट १ कोटी ६२ लाख १२ हजार रुपयात लिलाव झाला होता. मात्र यावर्षी चारही रेतीघाटातून एवढी रक्कम मिळालेली नाही. पर्यावरण व भुजल विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे व रेती माफीयांच्या स्पर्धेमुुळे जिल्ह्यातील ७० टक्के रेतीघाटांचे लिलाव अजूनपर्यंत झालेले नाही. मोहाडी तालुक्यात लहान मोठे अशा २५ रेतीघाटापैकी चार रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. मात्र ज्या रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही त्या रेतीघाटावरुनही रेतीचा उपसा सुरूच आहे. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या रेतीची चोरी झालेली असून रेतीचोरी सुरूच आहे.
याव्यवसायात कनिष्ठ कर्मचार्यांपासून वरीष्ठ अधिकार्यांपर्यंत हात ओले होत आहेत. त्यामुळे रेती माफियांचे फावत आहे. परिणामी, शासनाच्या तिजोरीला कोट्यवधीचा फटका बसत आहे. मोहाडी तालुक्यातून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रातील ज्या रेतीघाटांचे लिलाव झाले ते लहान रेतीघाट असून त्या घाटालाच लागून असलेल्या मोठे रेतीघाट आहेत. या घाटावर रेतीचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. लिलावात घाट घेणारे संधीचा लाभ घेत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक ज्या घाटांचे लिलाव झालेले आहेत, तेथील रेती वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना ट्रांजिक्शन पासेस देण्यात आल्या आहेत. त्या पासेसवर नोंद असलेल्या ब्रासपेक्षा जास्त ब्रास रेतीची वाहतूक करण्यात येते. अर्थात ट्रक किंवा ट्रॅक्टर ओव्हरलोड भरण्यात येतात. त्यामुळे अधिकची रेती वाहतूक करण्यात येत आहे. बेटाळा घाटावर हा प्रकार सर्रास सुरू आहे. एवढेच नव्हे तर लागून असलेल्या रेती घाटावरील रेतीचे उत्खनन सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)