बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:45 IST2019-05-25T00:45:06+5:302019-05-25T00:45:58+5:30
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली.

बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली. वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावले असून तलाव तथा बावनथडी कालवा परिसरात नागरिकांनी जावू नये म्हणून दवंडी दिली आहे.
बघेडा येथील अर्जुन रामपाल ठाकूर (६०) हा आपल्या शेळ्या चारण्यासाठी तलाव परिसरात गुरूवारी गेला होता. त्यावेळी एका पट्टेदार वाघाने अचानक हल्ल करून शेळी ठार मारली. या शेळीला ओढत जंगलातील कालव्याच्या सिमेंट पाईपमध्ये बस्तान मांडले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावरून वनरक्षक राकेश फोंदाने यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सिमेंटच्या पाईपमध्ये बसलेला वाघ आणि त्याच्याजवळ शिकार केलेली शेळी दिसून आली. या परिसरात वनविभागाने कॅमेरे लावले असून रात्री उशिरा वाघ त्याठिकाणावरून निघून दुसरीकडे गेला.
या प्रकाराने बघेडा व पवनारा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी या परिसरात जावू नये, अशी दवंडी देण्यात आली आहे. नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.