भंडाऱ्यात बागडे, तुमसरात कारेमोरे
By Admin | Updated: August 5, 2014 23:18 IST2014-08-05T23:18:13+5:302014-08-05T23:18:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाच्या मतभेदानंतर आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव बागडे हे १७-१५ अशा मताने विजयी झाले. बागडे हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले आहे.

भंडाऱ्यात बागडे, तुमसरात कारेमोरे
नगरपरिषद निवडणूक : उपाध्यक्षपदी कविता भोंगाडे, सरोज भुरे
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाच्या मतभेदानंतर आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव बागडे हे १७-१५ अशा मताने विजयी झाले. बागडे हे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले आहे. उपाध्यक्षपदी राकाँच्या कविता भोंगाडे या विजयी झाल्या. सभेत झालेल्या गदारोळामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
३२ सदस्यीय भंडारा नगरपालिकेत राकाँचे १६, भाजप ६, शिवसेना २, काँग्रेस ३, अपक्ष ४ तर भाकप १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपद निवडणुकीची तारीख जवळ येत असतानापासून राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. यात बाबूराव बागडे आणि धनराज साठवणे यांचा गट एकमेकांसमोर होता. फोडाफोडीच्या राजकारणात शेवटच्या क्षणी कोण विजयी ठरतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज सकाळी पालिका सभागृहात विशेष सभा सुरु झाली. उपविभागीय अधिकारी रविंद्र कुंभारे, मुख्याधिकारी रविंद्र देवतळे हे पीठासीन अधिकारी होते.
३२ नगरसेवकांच्या सभेला सुरुवात होताच गटबाजीमुळे गदारोळ निर्माण झाला. अध्यक्षपदासाठी बाबूराव बागडे व धनराज साठवणे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी कविता भोंगाडे व रुबी चड्डा यांनी नामांकन दाखल केले. यात बागडे यांना १७ तर साठवणे यांना १५ मते पडली. बागडे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कविता भोंगाडे या १७-१५ च्या फरकाने विजयी झाल्या.
निवडणूक झाल्यानंतर विद्यमान नगराध्यक्ष बागडे व उपाध्यक्ष भोंगाडे यांनी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यकर्त्यांसह नागरिकांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. यानंतर मावळत्या नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी विद्यमान नगराध्यक्ष बागडे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
निवडणुकीत गदारोळ निर्माण झाल्याने गांधी चौकात जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना समोर यावे लागले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही, सत्ताधाऱ्यांनी धक्काबुक्की केली, असा विरोधकांचा आक्षेप होता. यावेळी आतील बाहेरील वातावरण तणावग्रस्त होते. (प्रतिनिधी)