१०० कामगार कारखान्यातून बडतर्फ
By Admin | Updated: January 29, 2016 04:06 IST2016-01-29T04:06:20+5:302016-01-29T04:06:20+5:30
युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी

१०० कामगार कारखान्यातून बडतर्फ
तुमसर : युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी कामगार संघटना स्थापन केल्याने रोजंदारी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद आहे. नियमानुसार वेतन, सुविधा नाही, महिन्यातून जेव्हा कारखान्यात काम राहील, तेव्हा बोलाविण्यात येईल, असा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. याप्रकरणी कामगारांनी तुमसर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
माडगी (मानेकनगर) येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे १०० रोजंदारी कामगार आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रथम महिन्यातून २६ दिवस, नंतर १९ दिवस व एक महिन्यापूर्वी कामगार संघटना स्थापन केल्यानंतर जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा बोलाविण्यात येईल, असा आदेश कंपनी व्यवस्थापनाने दिला. गुरुवारी सकाळी ८ वाजता १०० कामगार आले. परंतु कारखान्याच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कारखान्यात जाण्यासाठी मज्जाव करून तुम्हाला कारखान्यात जाता येणार नाही, असे सांगितले.
रोजंदारी कामगारासोबत चर्चा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचा कुणीही अधिकारी आले नाही. दुपारी दोन वाजताच्या शिफ्टमध्ये १०० पैकी चार ते पाच कामगारांना घेता येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर १८ कामगारांना घेण्यात येत आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले.
एक महिन्यापूर्वी रोजंदारी कामगारांनी भंडारा जिल्हा कामगार संघाची शाखा येथे सुरु केली. संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत कारखान्याबाहेर संघाचा फलक लावला. बुधवारी रात्री हा फलक येथे काढण्यात आला. यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊन कंपनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कामगार म्हणाले, आम्हाला मागील काही महिन्यापासून या कामगारांना १९ दिवसाचा पगार ४,४६५ देण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना २३५ रुपये मजुरी मिळते. कंपनी प्रशासन किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा, घरभाडे भत्त्यांपासून वंचित ठेवत आहे. रोजंदारी कामगार उत्पादन प्रक्रियेत आॅपरेटर मदतनिसची कामे दिवसरात्र पाळीमध्ये करतात. रोजंदारी कामगार रामदास हलमारे, कैलास दामन, मुरलीधर कनपटे, चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, मुकुंद बांते कारखान्यात दि. १६ जानेवारीला आले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी अर्वाच्च शब्दात बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली, परंतु पोलिसांकडून चौकशी करण्यात आली नसल्याचाही कामगारांनी आरोप केला आहे.
कामगारांना काढून टाकण्यात आल्यामुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले असून कारखान्यातील अनियमितेबद्दल चौकशी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. यासंदर्भात कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जुनारकर, चक्रवर्ती यांच्याशी संपर्क केले असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (तालुका प्रतिनिधी)
रोजंदारी कामगारांनी संघटित होऊन न्याय हक्काकरिता संघटना स्थापन केली. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने दडपशाही प्रवृत्तीचा अवलंब केला. न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार आहे.
- श्रीकांत पंचबुद्धे,
अध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ, भंडारा.