जागृतीच्या राज गायकवाड याच्या पत्नीला अटक
By Admin | Updated: June 30, 2016 00:14 IST2016-06-30T00:13:28+5:302016-06-30T00:14:51+5:30
फसवणूक प्रकरण : भंडारा पोलिसांची कारवाई

जागृतीच्या राज गायकवाड याच्या पत्नीला अटक
सांगली : भंडारा जिल्ह्यातील मोगरा (शिवणी) येथील एकाची साडेअकरा लाखाला फसवणूक केल्याप्रकरणी जागृती अॅग्रो फूडस्चा सर्वेसर्वा राज गायकवाड याची पत्नी जई गायकवाड (वय ३८, रा. वखार भाग, सांगली) हिला बुधवारी भंडारा पोलिसांनी सांगलीत अटक केली. शेळीपालनात गुंतवणूक करून लाभाचे आमिष दाखवित फसवणूक केल्याचा गुन्हा लाखणी (जि. भंडारा) येथे दाखल झाला होता.
याबाबत लाखणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले की, मोगरा येथील विजय महादेव खोब्रागडे यांनी सांगलीतील जागृतीचा अध्यक्ष राज गायकवाड, संचालक जई गायकवाड, विदर्भातील संचालक प्रशांत सोनारे, भंडाऱ्यातील संचालक प्रज्ञाशील रोगडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात रोगडे याला अटक करण्यात आली, तर जई गायकवाड ही तीन महिन्यांपासून फरारी होती. तिला बुधवारी सांगलीतून अटक करण्यात आली आहे.
गायकवाड याच्या सोनारे व रोगडे या संचालकांनी खोब्रागडे यांना अॅग्रो फूडस्च्या शेळीपालन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी एजंटही नेमले होते. या व्यवसायात शेतकऱ्याने एक शेळी दिल्यास १४ महिन्यानंतर पाच हजार व दहा महिन्यानंतर चाळीस हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले. खोब्रागडे यांची जमीन भाड्याने घेऊन त्यांना दहा लाख रुपये गुंतविण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात त्यांना टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले होते. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोब्रागडे यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. यात पोलिसांनी रोगडे याला अटक केली आहे, तर उर्वरित संशयित फरारी होते. जई गायकवाड ही सांगलीत असल्याची माहिती मिळताच तिचा शोध घेऊन तिला अटक करण्यात आल्याचे निरीक्षक चकाटे यांनी सांगितले. तिला घेऊन पोलिसांचे पथक भंडाऱ्याला रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)