नुकसानभरपाईसाठी पीक विमा कंपनीची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:29+5:302021-04-05T04:31:29+5:30
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ ...

नुकसानभरपाईसाठी पीक विमा कंपनीची टाळाटाळ
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीक विमा कंपनीने हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीक कर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपनीकडून मदत मिळाली नसल्याने पीककर्ज अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.
बॉक्स
तीन एकरातील धान पीक उद्ध्वस्त होऊनही विमा कंपनीने हात वर केले
भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील सुरेश गिरीपुंजे यांच्या शेतातील चार एकर धान पीक तुडतुडा पिकाने उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, सोसायटीचे प्रतिनिधी, पीक विमा प्रतिनिधी, गावचे उपसरपंच यांनी पाहणी केली होती. त्यानंतर विमा कंपनीकडून मदत मिळेल अशी आशा होती. मात्र, वारंवार फोन करूनही विमा प्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी विमा कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. फक्त भंडारा तालुक्यातच नव्हे तर पवनी, लाखांदूर, तुमसर तालुक्यातही हजारो शेतकरी आजही पीक विमा मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी अनेकदा विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करतात. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बॉक्स
पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपनीच्या फायद्यासाठी
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र शासनाने खरीप आणि रबी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविली. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ४०१ शेतकरी खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, त्या तुलनेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की पीक विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणीही होत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विमा प्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज आहे.
कोट
धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.
सुरेश गिरीपुंजे,
शेतकरी, खरबी नाका.