तीन महिन्यांपासून जमा पैसे देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST2021-03-27T04:36:50+5:302021-03-27T04:36:50+5:30

मोहाडी : डाक कार्यालय मोहाडी येथे बचत ख्यात्यात जमा केलेले पैसे काढण्यास गेलेल्या महिलेला मागील तीन महिन्यांपासून देण्यास टाळाटाळ ...

Avoid paying deposits for three months | तीन महिन्यांपासून जमा पैसे देण्यास टाळाटाळ

तीन महिन्यांपासून जमा पैसे देण्यास टाळाटाळ

मोहाडी : डाक कार्यालय मोहाडी येथे बचत ख्यात्यात जमा केलेले पैसे काढण्यास गेलेल्या महिलेला मागील तीन महिन्यांपासून देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा अजब प्रकार येथे सुरू आहे. पासबुकमध्ये जितक्या पैशांची नोंद आहे, तेवढी नोंद खात्यात नाही, असे त्यांना सांगण्यात येते. त्यामुळे ही महिला रडकुंडीस आलेली आहे.

डाक उपविभाग कार्यालय मोहाडी येथे उषा सुरेश सुखदेवे या महिलेने २० एप्रिल २०१६ ला बचत खाते उघडून त्यात भविष्याच्या दृष्टिकोनातून थोडे थोडे पैसे जमा केले. त्यांनी जितके पैसे जमा केले, त्याची नोंद पासबुकमध्ये करण्यात आली, परंतु त्यांनी भरलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा न करता तत्कालीन कर्मचाऱ्याने स्वतःच्या खिशात टाकले. हे पैसे अडीअडचणीच्या वेळी कामी येतील, असा त्यांना विश्वास होता.

डिसेंबरमध्ये त्यांना काही महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी जमा केलेले पैसे काढण्याचा फॉर्म २२ डिसेंबर २०२० रोजी भरला. त्या महिलेला असे वाटले की फॉर्म भरल्यानंतर लगेच इतर बँकांप्रमाणे येथेही पैसे मिळतील. मात्र, त्यांना तीन-चार दिवसांत तुमचे पैसे मिळतील, असे सांगण्यात आल्याने त्या निराश झाल्या. परंतु डाक विभागाचा नियम त्यांना सांगण्यात आल्याने त्या चार दिवसांनंतर पुन्हा डाक कार्यालयात गेल्या. परंतु त्यांना तेव्हाही पैसे देण्यात आले नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत त्या महिलेला वेगवेगळी कारणे सांगून परत पाठविण्यात येत आहे. स्वतःचे पैसे असूनही त्यांना दुसऱ्यांकडून हातउसने पैसे घेऊन आपले महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागले. आज तीन महिन्यांचा काळ लोटला तरी त्यांचे पैसे परत करण्यात आलेले नाहीत. माझेच पैसे मिळविण्यासाठी मला शासकीय कार्यालय असूनही पायपीट करावी लागत असून, माझ्या घामाचे पैसे मला मिळतील की नाही? अशी शंका येत असल्याने त्यांची रात्रीची झोपसुद्धा उडालेली आहे. डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून माझे पैसे मला मिळवून द्यावेत, अशी विनंती त्या महिलेने केली आहे.

कोट बॉक्स

त्या महिलेच्या खात्यात व पासबुकमधील एन्ट्रीमधे तफावत असल्याने पासबुक तपासणीसाठी भंडारा व नंतर नागपूरला पाठविण्यात आले असल्याने वेळ लागत आहे.

- भोलाराम सोनकुसरे, पोस्टमास्टर - मोहाडी

Web Title: Avoid paying deposits for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.