The average turnout in Bhandara district gram panchayat is 85% | भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५ टक्के मतदान

भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५ टक्के मतदान

ठळक मुद्देमतदानासाठी ठिकठिकाणी रांगा, लाखांदुरमध्ये ८३.२३ तर लाखनीत ८४.२९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : १४५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील १६८ केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सरासरी ८५ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७०.९७ टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रावर रांगा असल्याने अंतिम टक्केवारी मिळण्यास उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. मतदानाला सकाळपासून उत्साहात प्रारंभ झाला. दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली होती. त्यापैकी भंडारा, पवनी आणि साकोली तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत अविराेध झाल्याने शुक्रवारी १४५ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील २७४५ उमेदवारांसाठी मतदान पार पडले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सर्वत्र उत्साह संचारल्याचे दिसत होते. सकाळी ९.३० पर्यंत ९.४७ टक्के मतदान पार पडले. त्यात महिला ६.६५ टक्के तर पुरुष १२.६४ टक्के मतदारांचा समावेश होता. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २६.८२ टक्के झाली. त्यात महिला २४.८३ तर पुरुष २८.७७ टक्के होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत ५१.१० टक्के मतदान पार पडले. त्यात महिला ५५.६४ टक्के तर पुरुष ४६.६७ मतदानाचा समावेश आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७०.९७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ७५.६३ टक्के महिला तर ६६.४१ टक्के पुरुषांचा समावेश आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत १ लाख ९९ हजार ६१७ मतदारांपैकी १ लाख ४१ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसत होती.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत तुमसर तालुक्यात ७२.१३ टक्के, मोहाडी तालुक्यात ७४.१० टक्के, भंडारा ७०.०३ टक्के, पवनी ६६.११ टक्के, साकोली ७२.९९ टक्के, लाखनी ७२.५९ टक्के आणि लाखांदूरमध्ये ७०.९७ टक्के मतदान झाले होते. लाखांदूर तालुक्यात ८३.२३ टक्के अंतिम मतदान झाल्याचे सांगण्यात आले तर लाखनीमध्ये ८४.२९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यात ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ७१ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ६५५ पोलीस, ३३४ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. मतदानाच्या ठिकाणी चांगलीच चुरस दिसत होती. उमेदवार मतदारांना मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी येण्यासाठी प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र दिसत होते. गावात उत्सवाचे वातावरण होते.

सकाळपासून उत्साह असला तरी सायंकाळी मात्र अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लांगल्या होत्या. मतदानाची वेळ संपल्यानंतरही रांगा असलेल्या मतदान केंद्रावर मतदान सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याची माहिती होती. यामुळेच मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास विलंब लागणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी ५२६ मतदार केंद्राध्यक्ष, १५७८ मतदान अधिकारी आणि ४४८ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक पार पाडली. ग्रामपंचायत निवडणूक असल्याने ग्रामीण भागात वाद होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पोलिसांची करडी नजर या प्रत्येक मतदान केंद्रावर होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदानानंतर मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्र घेऊन संबंधित तहसील कार्यालयात पोहचणार होते. त्यासाठी प्रशासनाने एसटी बसेस व वाहनांची व्यवस्था केली होती. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

कोरोनाच्या खबरदारीचा फज्जा

ग्रामपंचायत निवडणूक कोरोना संसर्गाच्या काळात घेण्यात आली. प्रशासनाने ही निवडणूक घेताना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा पाहून फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. अनेकांनी तर रांगेत असताना मास्कही लावले नव्हते. परंतु मतदान केंद्रात जाताना अनेक जण आपल्या खिशातील मास्क काढून तोंडावर चढवित असल्याचे दिसत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली होती. थर्मलगनने तपासणी करून मतदारांना आतमध्ये सोडले जात होते.

दुपारनंतर वाढला मतदानाचा वेग

सकाळी संथगतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारनंतर चांगलाच वेग घेतला. बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. सायंकाळी तर अनेक ठिकाणी लांब रांगा लागल्याचे दिसत होते. मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरू होते.

सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी

जिल्ह्यातील १४८ पैकी ३ ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. शुक्रवारी १४५ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. मतमोजणी संबंधित सात तहसील कार्यालय परिसरात केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

दुपारी ३.३० पर्यंत महिलांची टक्केवारी अधिक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७०.९७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यात महिला मतदारांची सर्वाधिक संख्या दिसत होती. ७५.६५ टक्के महिला तर ६६.४१ टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ९८ हजार ६१० महिला मतदारांपैकी ७४ हजार ६०२ महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. ३.३० वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान मोहाडी तालुक्यात तर सर्वात कमी मतदान पवनी तालुक्यात झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या गावांकडे पोलीस यंत्रणेचे अधिक लक्ष होते. लाखांदूर तालुक्यातील नक्षलप्रभावीत गावांमध्ये पोलिसांचा दगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.दुपारी ३.३० पर्यंत महिलांची टक्केवारी अधिक होती.

Web Title: The average turnout in Bhandara district gram panchayat is 85%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.