१९ तासानंतर झाले शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:37+5:302021-04-01T04:35:37+5:30
कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे ...

१९ तासानंतर झाले शवविच्छेदन
कोंढा (कोसरा) : ग्रामीण रुग्णालय पवनी येथे १९ तासानंतर केले जाते शवविच्छेदन, यावर आपला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. २९ मार्च रोजी निमगाव येथील पवन बागडे यांचा अपघात सायंकाळी ५ वाजता झाला. तसेच अकोला जिल्ह्यातील झिल्हा या गावचे समीर बळवंत साताडे यांचे २९ मार्चला रात्री ८ वाजता अपघातात निधन झाले. पवन बागडे यांचा मृतदेह ५ वाजता शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. समीर साताडे यांचा मृतदेह रात्री ८ वाजता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला.
या दोन्ही अपघात झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन तब्बल १९ तासानंतर करण्यात आले. रात्रभर हे मृतदेह दवाखान्यामध्ये पडून होते. सकाळी डॉक्टरची ड्युटी नियमाप्रमाणे ९ वाजताच्या आत असते. डॉक्टरांनी या कालावधीमध्ये रुग्णालयात हजर राहणे गरजेचे असते. परंतु याठिकाणी कार्यरत असणारे व ज्याच्याकडे जबाबदारी आहे असे डॉक्टर दिघोरे हे ११.३० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे हजर झाले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी यासंबंधाची कल्पना त्यांना दिल्यानंतरदेखील त्यांनी शवविच्छेदनाकडे दुर्लक्ष केले. ओपीडीमध्ये रुग्णांना तपासाचे काम सुरू केले. यासंदर्भामध्ये विचारणा करण्याकरिता मृतांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी डॉक्टर दिघोरे यांच्याकडे विचारणा केली. ‘मी कोविड पेशंट व टायफाईडचे पेशंट तपासत आहे, त्यानंतर मी पोस्टमार्टेम करेन’ असे उत्तर डॉक्टर दिघोरे यांनी दिले.
ग्रामीण रुग्णालयामध्ये शीतकपाट नाही तसेच बर्फाचीदेखील व्यवस्था नाही. हे दोन्ही मृतदेह उघड्यावर त्या ठिकाणी होते. १९ तासानंतर त्यांच्या शरीराची दुर्गंधी येऊ लागली. परंतु डॉक्टर दिघोरे यांना त्याची काहीच चिंता नव्हती. येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी ११ नंतरच येतात. डॉक्टर दिघोरे यांनी १२.१५ वाजता शवविच्छेदन सुरू केले. १२.३० वाजता मृतांच्या नातेवाईकाकडे त्यांचे मृतदेह सुपूर्द केले. १९ तास वाट पाहिल्यानंतर शवविच्छेदन केले जाते, ही खेदाची बाब आहे. साधारणतः अकोला येथे जायला पाच ते सहा तास लागतात. अशावेळी त्या लोकांनी अंत्यसंस्कार कसे करावेत, एकीकडे दुर्गंधीही येत होती. कोणतेही कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्यावर कुणाचेही निर्बंध नाही. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे.