महिला कर्मचाऱ्याची प्रामाणिकता
By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:48:05+5:302014-08-09T00:48:05+5:30
येथील सर्व शिक्षा अभियान विभागात कार्यरत असलेले प्रकाश गजानन काळे यांच्या कार्यालयीन कपाटातून दोन लाखांची रोकड मंगळवारी गायब झाली.

महिला कर्मचाऱ्याची प्रामाणिकता
भंडारा : येथील सर्व शिक्षा अभियान विभागात कार्यरत असलेले प्रकाश गजानन काळे यांच्या कार्यालयीन कपाटातून दोन लाखांची रोकड मंगळवारी गायब झाली. ती रक्कम आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास महिला कर्मचारी अरुणा मोटघरे हिला सापडली. तिने प्रामाणिकता दाखवून परत केली. तिची प्रामाणिकता जिल्हा परिषदमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील प्रकाश काळे हे जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानात संगणक प्रोग्रामर म्हणून कार्यरत आहेत. पाच तारखेला त्यांनी गावावरून येताना काका यशवंत काळे यांनी घेतलेल्या मारूती गाडीचे पैसे द्यायचे असल्याने त्यांच्याकडून दोन लाख रूपये सोबत आणले. दरम्यान कार्यालयात उपस्थित होण्याची सकाळची वेळ झाल्याने ते रक्कमेसह जिल्हा परिषदमध्ये आले. यावेळी त्यांनी कागदात बांधलेली व प्लॉस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली रक्कम स्वत:च्या कपाटात ठेवून कामाला सुरूवात केली. काही कालावधीनंतर ती रक्कम कपाटात नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यावरून त्यांनी इतरत्र चौकशी केली. मात्र रक्कम न मिळाल्याने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास चतुर्थ कर्मचारी असलेल्या अरुणा मोटघरे या कर्तव्यावर आल्या. त्यांनी सर्व शिक्षा अभियान विभागाचे मुख्य दार काढले असता त्यांना एका हिरव्या रंगाच्या प्लॉस्टिकमध्ये कागदात पैसे असल्याचे लक्षात आले.
ही बाब त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितले. यावेळी सदर रक्कम काळे यांच्या सुपूर्त केली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्याने त्यांनी हरविलेली रक्कम ताब्यात घेतली आहे. काळे यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीमुळेच चोराची भंबेरी उडाल्याने त्याने सदर रक्कम सर्व शिक्षा अभियानाच्या दाराच्यावर असलेल्या मोकळ्या जागेतून दालनात टाकली असावी, असा संशय वर्तवितण्यात येत आहे.
एवढी मोठी रक्कम चोरून नेण्याची हिंमत कदाचित याच विभागात कार्यरत असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याने केली असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चतुर्थ कर्मचारी असलेल्या अरुणाने आपली प्रामाणिकता दाखवून दोन लाखांची रक्कम परत केल्याने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये तिच्या कृतज्ञतेबद्दल चर्चा रंगली होती. (शहर प्रतिनिधी)