बेरोजगारांची फसवणूक करणारा ठकबाज अटकेत
By Admin | Updated: July 18, 2016 01:26 IST2016-07-18T01:26:50+5:302016-07-18T01:26:50+5:30
वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय झालेला आहे,

बेरोजगारांची फसवणूक करणारा ठकबाज अटकेत
पवनी पोलिसांची वर्धेत कारवाई
पवनी : वनविभागात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय झालेला आहे, अशी खोटी बतावणी करुन सन २०१४ मध्ये शंभरावर युवक-युवतींना लक्षावधी रूपयांनी गंडविणाऱ्या वर्धेचा मास्टरमार्इंड जुगल किशोर चव्हाण (५३) याला तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे.
वनविभागात वनरक्षक, वनपाल, वाहनचालक या पदावर कायम करण्याची हमी देवून दोन वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यातील शंभरावर बेरोजगार युवक- युवतीकडून २ लक्ष अग्रीम रुपये घेतले. यात या बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या जुगल किशोर चव्हाण (५३) रा. वर्धा, अशफाक अली अजगर अली (५०) रा. पद्मा वार्ड पवनी व रविंद्र मधूकर डिब्बे रा. गोसेखुर्द यांचे विरुध्द पवनी पोलिसात मार्च २०१६ मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती.
प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु होता. फिर्यादी दीपक सत्यवान साखरे (३४) रा. गोसे यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली होती. तपासाला गती देण्यात आली. अखेर पोलीस उपनिरीक्षक गदादे यांच्या नेतृत्वात पोलिसांची चमू वर्धेला दाखल झाली. जुगल किशोर चव्हाण हा घराबाहेर बाहेर जात असताना पकडण्यात आले. फिर्यादी दीपक साखरे रा. गोसे यांनी २७ जुलै २०१४ रोजी जुगल किशोर चव्हाण, अशफाक अली अजगर अली व रविंद्र डिब्बे यांचेकडे सहा लाख रुपये रोखीने दिले. त्यावेळी प्रतिक्षा यादीमध्ये तुमचा नंबर लागेल. त्यानंतर प्रशिक्षणाला जावे लागेल असे रक्कम घेतल्यानंतर सांगण्यात आले. काही दिवसानंतर ४५ व्या क्रमांकावर नाव असलेली यादी व बनावट आदेश तक्रारकर्त्याला देण्यात आली. हा आदेश पाहून उर्वरित युवक युवतींनी ठरल्यानुसार पूर्ण रक्कम संबंधिताकडे दिली पंरतु कोणालाही नियुक्ती आदेश प्राप्त झाले नाही. त्यानंतर दीपक साखरे यांच्याकडे असलेला आदेश व प्रतीज्ञा यादीची प्रत वनविभागाचे अधिकाऱ्यांना दाखविली असता आदेश व प्रतिक्षा यादी बनावट असुन असा कोणताही शासन निर्णय किंवा त्यानुसार नियुक्त्या होणार नाहीत, हे समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच मार्च २०१६ मध्ये पवनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
१६ जुलै रोजी पवनी पोलिसांनी चमू वर्धेला रवाना झाली. त्यांनी प्रमुख आरोपी जुगल किशोर चव्हाण यास अटक केली. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अन्य दोन आरोपींच्या शोधात आहेत. (तालुका प्रतिनिधी)