बाबासाहेबांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: April 28, 2016 00:24 IST2016-04-28T00:24:57+5:302016-04-28T00:24:57+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बाबासाहेबांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा प्रयत्न
रामदास आठवले : भारत-भीमयात्राचे स्वागत
भंडारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांनी समाजव्यवस्था जोडली आहे. ‘जाती तोडो - भारत जोडो’ हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
यावेळी खा.आठवले म्हणाले, आम्ही भाजपाला साथ दिली याचा अर्थ आम्ही भाजपचा ‘अजेंडा’ चालवितो, असे नाही. ही राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही पक्षासोबत राहूच असेही नाही. आमचा पक्ष निळ्या झेंडा घेऊन जात आहे. प्रधानमंत्री मोदी यांची भूमिका योग्य आहे.
दलित समाजाच्या आरक्षणाला कुणीही हात लावत नाही. ज्यांना आरक्षण नाही, असे महाराष्ट्रातील मराठा, गुजराततेतील पटेल, राजस्थानातील राजपुत आणि हरियाणातील जाट समुदायाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी आपण संसदेत केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत बुधवारला भंडाऱ्यात आली आहे. या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू या ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) भंडारा जिल्ह्याच्यावतीने बुधवारला दुपारी त्रिमूर्ती चौकात भारत भीम यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा छत्तीसगड राज्यातील राजनांदगावकडे रवाना झाली. यावेळी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, म.दा. भोवते, बोरकर, अमृत बन्सोड, आसीत बागडे, भाजपचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, मयुर बिसेन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)