समयसूचकतेने फसला अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: August 3, 2015 00:27 IST2015-08-03T00:27:27+5:302015-08-03T00:27:27+5:30
तुझ्या आईची प्रकृती बरी नाही. तुला बोलाविले असे सांगून एका अनोळखी इसमाने रवियाचे हात पकडून ओढत असताना..

समयसूचकतेने फसला अपहरणाचा प्रयत्न
तुमसर : तुझ्या आईची प्रकृती बरी नाही. तुला बोलाविले असे सांगून एका अनोळखी इसमाने रवियाचे हात पकडून ओढत असताना बाजूला असलेल्या फिजाने समयसूचकता दाखवून त्या इसमाच्या हाताला जोरदार चिमटा घेतला व त्याच्या तावडीतून सुटका करुन घराकडे पळ काढला. ही घटना ३१ जुलैला सकाळी १० वाजता सुमारास फ्रुट मार्केटजवळ घडली.
रविया अंजुम शकिल मालाधारी ही इयत्ता ५ वी तर फिजा सलाम शेख इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी असून त्या दोन्ही येथील शारदा विद्यालयात शिकत आहेत. ३१ जुलै २०१५ रोज शुक्रवारला स्थानिक शारदा विद्यालय तुमसर येथे नागपूर बोर्डचे इयत्ता १० वीचे पेपर सुरु असल्यामुळे सकाळपाळीत शाळा सुरु आहे. त्यामुळे ९.४५ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. वर्ग ५ मध्ये शिकत असलेली रविया फिजा या दोघी विद्यार्थ्यांनी घराच्या दिशेने जाण्यास निघाल्या. दरम्यान तुमसर येथील फ्रुट मार्केटजवळ पोहचताच एका अनोळखी इसम रवियाचा हात पकडून तुझ्या आईची प्रकृती बरी नाही, घरी बोलाविले, असे म्हणून रवियाचा हात ओढत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना रवियाने नकार देत तिने विरोध करताच सोबत असलेल्या फिजाने त्या अनोळखी इसमाच्या हाताला जोरदार चिमटा घेतला व रवियाला त्याच्या तावडीतून सोडवून घाबरलेल्या स्थितीत त्यांनी घराकडे पळ काढल्याने तो इसम पसार झाला. मुली घरी पोहोचताच त्यांनी पालकांना आपबिती सांगितली. दोन्ही मुलींच्या पालकांनी तुमसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. मुलींना आरोपीचे वर्णन विचारले असता त्यांनी आरोपी ४५ ते ५० वयोगटातील असून तो काळा पँट व काळीच बनियान घातलेला होता, असे सांगितले. शुक्रवारी मार्केट बंद असल्याने त्या मार्गावर रहदारी कमीच असल्याची संधी त्या अनोळखी इसमाने संधी साधली असावी. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी चौकशी सुरु केली असून त्या इसमाचा शोध घेणे सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)