आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला संघटनांचा पाठिंबा
By Admin | Updated: March 25, 2015 00:46 IST2015-03-25T00:46:21+5:302015-03-25T00:46:21+5:30
कालपासून बाबा खंताळू माध्यमिक आश्रमशाळा, गोसे बुज येथील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे वेतनाच्या मागणीसाठी..

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला संघटनांचा पाठिंबा
भंडारा : कालपासून बाबा खंताळू माध्यमिक आश्रमशाळा, गोसे बुज येथील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे वेतनाच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा कार्यालयाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने देवून त्यांना वेतन देण्याची मागणी करण्यात आली पण या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला राज्य आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष माणिकराव अंधारे, सरचिटणीस गोविंदा गुंजाळ, कॉलेज आश्रमशाळा कृती समिती, म.रा. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह पवार, बाबा साहेब नाईक आश्रमशाळा कनिष्ठ महा. पातुर अकोला आदी संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गोसीखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्त गावात असलेल्या या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना १२ महिन्यापासून शासन वेतन न देवून त्यांना वेठीस धरत आहे. या आंदोलनास गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी आपले समर्थन घोषित केले आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे कर्मचारी क्षुब्ध झाले असून सर्व संघटनांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)