प्रथा-परंपरांना फाटा देत भूकंपग्रस्तांना मदत
By Admin | Updated: April 30, 2015 00:44 IST2015-04-30T00:44:04+5:302015-04-30T00:44:04+5:30
आप्तस्वकीयांचे निधन अथवा पुण्यतिथीनिमित्त आयोजित केले जाणारे धार्मिक विधी तसेच कर्मकांडांना फाटा देत ....

प्रथा-परंपरांना फाटा देत भूकंपग्रस्तांना मदत
भंडारा : आप्तस्वकीयांचे निधन अथवा पुण्यतिथीनिमित्त आयोजित केले जाणारे धार्मिक विधी तसेच कर्मकांडांना फाटा देत यावर खर्च होणारा पैसा एका कुटुंबाने नेपाळ येथील भूकंप पीडीतांसाठी दिला. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लेखापाल अजय बन्सोड यांनी त्यांच्या मुलीच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त प्रथा परंपरा बाजुला सारत ५,५५५ रुपये मदत निधीचा धनादेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या सुपूर्द केला.
जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतील लेखापाल अजय बन्सोड यांची मुलगी रुचिका बन्सोड (१८) हिचे मागीलवर्षी २९ एप्रिल रोजी आकस्मिक निधन झाले होते. तिच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कोणतेही धार्मिक विधी किंवा कर्मकांड न करता यावर खर्च होणारा निधी नेपाळ येथील भूकंप पीडितांसाठी पाठविण्याचा निर्णय अजय बन्सोड यांनी घेतला. त्यानंतर ५,५५५ रुपयांचा धनादेश त्यांनी बुधवार २९ एप्रिल रोजी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना प्रदान केला. हा धनादेश जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री मदत निधीसाठी दिला जाणार आहे. यावेळी बॅकेचे संचालक कैलास नशिने, सत्यवान हुकरे, नरेंद्र बुरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, मिलिंद हळवे, सुरेश कोटगलले उपस्थित होते. बन्सोड यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल बॅकेच्या संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)