अष्टविनायक : मेंढ्याचा भृशुंड, पवनीचा पंचमुखी
By Admin | Updated: September 18, 2015 00:34 IST2015-09-18T00:34:49+5:302015-09-18T00:34:49+5:30
विदर्भातील अष्टविनायकांपैकी दोन अष्टविनायकांचे स्थान भंडारा जिल्ह्यात आहे. एक भंडारा शहरातील मेंढा येथील भृशुंड गणपती तर दुसरे पवनी येथील पंचमुखी गणपती होय.

अष्टविनायक : मेंढ्याचा भृशुंड, पवनीचा पंचमुखी
भंडारा : विदर्भातील अष्टविनायकांपैकी दोन अष्टविनायकांचे स्थान भंडारा जिल्ह्यात आहे. एक भंडारा शहरातील मेंढा येथील भृशुंड गणपती तर दुसरे पवनी येथील पंचमुखी गणपती होय.
मेंढा येथील भृशुंड गणेश
भंडारा शहराच्या पुर्वेला असलेल्या मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या या शहराला ‘पितळ खोरे’ म्हणूनही ओळखले जाते. मेंढा परिसरात मोठा तलाव होता. याच परिसरात गिरीवंशीय गोसावींच्या समाधी आहेत. आता हा तलाव अस्तित्वात नाही. या समाधीला लागूनच हनुमंतांची आठ फूट उंचीची मूर्ती आहे. पूर्वी या भागातील लोक हनुमंतांची पुजा-अर्चना करायचे मात्र गणपती पुजनाकडे लक्ष देत नव्हते. या मंदिरात ‘श्री गणेशा’ची आठ फूट उंच आणि चार फूट व्यासाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या भागासमोर हेमाडपंथी शैलीतील शिवलिंंग, शेंदरी रंगाचा नंदी आहे. शिवलिंंगाची झीज होऊ नये, यासाठी शिवलिंंगावर पितळी कवच घालण्यात आले आहे. श्रींची मूर्ती अखंड शिळेवर कोरलेली आहे. पूर्ण शेंदूररचित मूर्ती चतुर्भूज असून मुषकावर (उंदीर) विराजमान असल्याची नोंद आहे. उजवा पाय खाली असून डावा पाय मांडी घातलेला आहे.
डाव्या हातात मोदक असून उजव्या हाताने गणेश भगवान आशीर्वाद देत आहेत. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाच्या जागी नाकपुड्या, डोळे, मिशा व दाढी दिसत असून चेहरा भव्य आहे. मुखापासून सोंड निघाली असून डाव्या हातावरील मोदकाकडे वळण घेतलेली आहे. कंबरेपासून गुडघ्याच्या पातळीत महावस्त्राचा पदर, मुषकाचे पाय व कान स्पष्टपणे दिसतात.
याठिकाणी तीन देवतांच्या मूर्ती आहेत. श्री गणेश, श्री जागृतेश्वर (शिवलिंग), श्री महावीर हनुमंत भगवान यांच्या त्या मूर्ती आहेत. इतिहासाच्या नोंदीनुसार या तिर्थस्थळाला श्री चक्रधर स्वामींनी भेट दिली आहे. इ.स. ११३० मध्ये मूर्तीस्थापना झालेली असावी. गणेशमूर्तीसमोरील शिवलिंंग व नंदीची स्थापना मंहत अलोणीबाबा यांनी केलेली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पवनीचा पंचमुखी गणपती
विदर्भाची काशी व मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पवनी शहराने आपली ओळख जपली आहे़ विदर्भाच्या अष्टविनायकांमध्ये पंचमुखी गणपती पवनी शहराच्या मध्यभागी गुजरी वॉर्डात हे मंदिर आहे़ या मंदिराला पंचमुखी गणेश व धुंडीराज या नावाने संबोधले जाते़ या मंदिराची स्थापना ११ व्या शतकातील आहे़
या मंदिरातील गणेश मुर्तीचे मुख हे सर्व दिशात (पुर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य) असून या मुर्तीच्या हातात लाडू व परसु डोक्यावर मुकूट स्पष्टपणे दिसतो. या कारणानेसुद्धा या मंदिरात पंचमुखी मंदिर म्हणून संबोधले जाते़ नैऋत्य व पश्चिम दिशेत मूर्ती सरळ उभी असून सोंडही सरळच आहे. मुर्ती चतुर्भुज स्वरूपाची आहे़ जाणकारांच्या मते, ही गणेश मुर्ती शमी या वृक्षाच्या लाकडापासून बनविण्यात आलेली आहे तर काही इतिहासकारांच्या मते ही मूर्ती वालुकरम दगडापासून बनविण्यात आली आहे़ ही मुर्ती एकाच शिला स्तंभावर चारही बाजुला गणेशच्या मुर्ती कोरलेल्या आहेत़ ही मूर्ती जमिनीपासून साडेतीन फुट उंच असून तितकीच जमिनीच्या आतही आहे़
या मुर्तीवर हेमाडपंथी संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे़ या पंचमुखी गणेश मंदिराजवळ टेम्बे स्वामीचा मंदिर आहे़ वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामीने पवनी या पावन भूमीवर चतुर्मास करून या पावनभूमिचे महत्त्व आणखी वाढविले आहे़ लोकांची अशी मान्यता आहे की, हे पंचमुखी मंदिर जागृत आहे़