आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित
By Admin | Updated: March 12, 2015 00:19 IST2015-03-12T00:19:36+5:302015-03-12T00:19:36+5:30
आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यापासून झाले नाही.

आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित
तुमसर : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यापासून झाले नाही. मार्च अखेरची तांत्रिक बाब असल्याने पुढे तीन ते चार महिने पुन्हा वेतन मिळणार नाही. यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे.
अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेपासूनच होईल अशी माहिती व ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानपरिषदेत दिली होती.
जुलै २०१४ पासून संगणक प्रणालीद्वारे वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. आॅनलाईन प्रक्रिया नव्याने सुरु झाली आहे. जर अधिकाऱ्यांनी या संदर्भात हलगर्जीपणा केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेदेखील ना.सावरा यांनी स्पष्ट केले होते. परंतु यामुळे संबंधित विभागावर काहीच फरक पडला नाही.
तुमसर तालुक्यातील आश्रमशाळांना दिवाळीनंतर वेतन प्राप्त झाले होते. यात जुलैचे वेतन १३.११.२०१४, आॅगस्टचे २८.११.२०१४, सप्टेंबरचे १६.१२.२०१४, आॅक्टोबरचे २४.१२.२०१४, नोव्हेंबरचा २७.१२.२०१४, जानेवारी २०१५ व फेब्रुवारीचे वेतन अजूनपर्यंत मिळाला नाही. मार्चअखेरच्या नावावर सुमारे ७ ते ८ महिने वेतन मिळणार नाही अशी भिती व्यक्त केली आहे. या संदर्भात शिक्षक आमदार नागो गाणार यांचेकडे शिक्षकांनी डिसेंबर २०१४ मध्ये तक्रारी केल्या होत्या.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भंडारा अंतर्गत एकूण ८ आदिवासी आश्रमशाळा सुरु आहेत. यात आदर्श आमगाव, खांबा जांभळी, माडगी, कोका जंगल, आंबागड, पवनारखारी, येरली, चांदपूर या शाळांमध्ये एकूण २११ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रकल्प कार्यालयात भोंगळ व निष्क्रिय कारभारामुळे या कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन होत नाही. येथे ४ महिन्यांचे तर कधी पाच महिन्यांचे एकदाच वेतन होते.दिवाळीनंतर कर्मचाऱ्यांना चार महिन्यापैकी फक्त एकाच महिन्याचे वेतन देण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)