आश्रमशाळा शिक्षकांचा संपाचा इशारा
By Admin | Updated: August 9, 2014 23:33 IST2014-08-09T23:33:15+5:302014-08-09T23:33:15+5:30
आठ अनुदानीत आश्रमशाळेतील २८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मागील सहा महिन्यापासून थकीत आहेत. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली

आश्रमशाळा शिक्षकांचा संपाचा इशारा
तुमसर : आठ अनुदानीत आश्रमशाळेतील २८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मागील सहा महिन्यापासून थकीत आहेत. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून कर्मचारी आता बेमुदत संपाच्या तयारीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात येरली, आंबागड, पवनारखारी, चांदपूर, कोका, माडगी (भंडारा), आदर्श आमगाव व खांबा जांभळी येथे अनुदानीत आश्रमशाळा आहेत. या शाळेत एकूण २८० शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या संदर्भात शिक्षक संघटनेने भंडारा येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना दि. १८ जुलै, १९ जुलै व २५ जुलै ला भेटून निवेदन दिले होते. २ आॅगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ११०० आश्रमशाळांची चौकशी १ आॅगस्ट पासून सुरु होणार होती. प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिक्षक कर्मचारी संघटनेला संपावर जाऊ नका, रखडलेले वेतन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येतील असे सांगीतले होते. सर्व शाळांची तपासणी झाल्यावर प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी पुन्हा घुमजाव केल्याचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.
भंडाऱ्याचे नियमीत प्रकल्प अधिकारी सध्या दिर्घ रजेवर आहेत. त्यामुळे देवरी येथील प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांचेकडे भंडाऱ्याचा प्रभार आहे. येथे निधी असूनही वेतन रखडले आहे. जिल्ह्यातील आठही आश्रमशाळांची प्रत्येक दिवशी एका शाळेची बाल प्रकल्प विभाग नागपूर येथील ५ पथकांनी सखोल तपासणी केली.
शालार्थ वेतन प्रणाली आठ ही शाळांनी नियमानुसार पूर्ण केली असून ती माहिती प्रकल्प कार्यालयाकडे देण्यात आली. प्रकल्प कार्यालयाने चुकीची माहीती जिल्हा कोषागार कार्यालयाला देण्यात आली त्यामुळे वेतन रखडल्याची माहीती संघटनेने दिली. शासनाने येथे जून्याच प्रणालीनुसार वेतन द्यावे, वेतन थांबवू नये अशा सूचना दिल्या आहेत त्या सूचनांकडे येथे दुर्लक्ष केल्या जात आहे. जिल्हा कोषागार अधिकारी अतुल गायकवाड यांचीही येथे मनमानी सुरु असल्याचा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. येत्या आठ दिवसात रखडलेले वेतन न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)