इसमावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला
By Admin | Updated: August 10, 2014 22:48 IST2014-08-10T22:48:51+5:302014-08-10T22:48:51+5:30
सरपण गोळा करण्यासाठी वडीलांसोबत जंगलात गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर दडी मारुन बसलेल्या अस्वलाने मागेहून हल्ला केला. यात अनिल नारायण राऊत (२८) हा गंभीररीत्या जखमी झाला.

इसमावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला
करडी (पालोरा) : सरपण गोळा करण्यासाठी वडीलांसोबत जंगलात गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर दडी मारुन बसलेल्या अस्वलाने मागेहून हल्ला केला. यात अनिल नारायण राऊत (२८) हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास किसनपूर जंगल शिवारात घडली. अनिलवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अनिल राऊत हे जांभोरा टोला येथील रहिवासी आहेत. सरपण गोळा करण्यासाठी अनिल हा आपल्या वडीलांसोबत किसनपूर जंगलात गेला होता. याच वेळी अस्वलाने अचानक हल्ला केला. अनिलचे वडील नारायण हे आरडाओरड करू लागले. तोपर्यंत अस्वलाने अनिलवर वर्चस्व मिळविले होते.
संघर्षानंतर अनिलला अस्वलाला पळवून लावण्यात यश आले. मात्र तोपर्यंत अनिल हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कपाळावर, पाठीवर व पोटावर खोल जखमा झाल्या आहेत. गस्तीवर असलेले वनकर्मचारी विनायक शेंडे व शामराव धार्मिक यांनी अनिलला उपचार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.झोडे यांनी औषधोपचार केले. मात्र अनिलची स्थिती गंभीर असल्यानेत्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यातआले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, पंचायत समिती सदस्य विलास गोबाडे यांनी भेट देत याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी मडावी, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी चोपकर, वनरक्षक बन्सोड यांनी याची माहिती उपवनसंरक्षकांना दिली. गंभीर जखमी झालेल्या अनिलला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आहे. (वार्ताहर)