शहरात कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By Admin | Updated: May 5, 2017 00:34 IST2017-05-05T00:34:00+5:302017-05-05T00:34:00+5:30

पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Artificial water scarcity in the cities | शहरात कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

शहरात कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

महिलांची भटकंती : इन्व्हर्टरवर टिल्लू पंप, पाण्याची चोरी सुरूच
भंडारा : पाण्याचा मुबलक साठा असूनही शुद्ध पाण्यासाठी तरसणाऱ्या भंडारेकरांना आता भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप लावून पाणी ओढले जात आहे. परिणामी पाणी टंचाईत अजुन वाढ झाली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहराला वळसा घालून जीवनदायीनी वैनगंगा नदी वाहते. गोसीखुर्द धरणात पाणी साठवण केल्यानंतर वैनगंगेचा जलस्तरही मोठ्या प्रमाणात वाढला. महिनाभरापुर्वी धरणातील पाणी सोडल्याने सध्यास्थितीत कारधा वैनगंगा नदीत सहा ते सात फुट पाणी आहे.
मात्र सदर पाणी दूषित आहे. जलशुद्धीकरण संयत्राच्या माध्यमातून हेच पाणी भंडारेकरांना पिण्यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे पुरविले जाते.
आधीच दूषित पाणीपुरवठा होत असताना उंच सखल भागात पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. त्यात पाणी चोरणाऱ्यांनी नामी शक्कल लढविली आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा काळात नगरपालिकेच्या विनंतीवरून सकाळी ७ ते ८ या वेळात विजेचा पुरवठा खंडित करण्यात येत असतो. मात्र याच काळात टिल्लू पंप लावणाऱ्यांचेही चांगलेच फावले आहेत.
एकीकडे वीज पुरवठा खंडित केल्यावरही टिल्लूपंपाच्या आधारे पाणी चोरणाऱ्यांचे मनसुबे बुलंदीवर आहेत. परिणामी नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी पाण्याच्या टंचाईत टिल्लूपंपाने कहर केला आहे. शहरातील बहुतांश वॉर्डात ईन्व्हरर्टरच्या सहायाने टिल्लूपंप चालविले जात आहे.
सर्वेक्षणानुसार एका टिल्लूपंपाच्या वापरामुळे जवळपास सात घरांना होणारा पाणीपुरवठा एकट्या एका घराला होत आहे. परिणामी शेजारधर्म विसरलेल्या माणसाला शेजाऱ्याचे पाणी चोरने अभिमानास्पद वाटत आहे. परंतु याचा फटका सर्वांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

तर टिल्लूपंपाची जप्ती व्हावी.
शहरात पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित होत असला तरी इन्व्हर्टरवर टिल्लूपंप लावले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने मोहिम राबवून सदर टिल्लूपंप जप्त करावे, अशी मागणी काही वॉर्डातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र या युक्तीचा गैरवारच होत असल्याचे दिसून येत आहे. वीज नसल्याने नळाची धारही वाढण्यापेक्षा उलट कमी झाली आहे. ७ वाजता नळाला पाणी यायचे मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पाणी यायची वेळ ७.३० पर्यंत वाढली आहे. काही भागात दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र संपूर्ण शहरात दोनवेळा पाणीपुरवठा होत नाही. हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Artificial water scarcity in the cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.