खुटसावरीत पाण्याची कृत्रिम टंचाई
By Admin | Updated: June 4, 2016 00:20 IST2016-06-04T00:20:06+5:302016-06-04T00:20:06+5:30
तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत असताना अचानक पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला.

खुटसावरीत पाण्याची कृत्रिम टंचाई
भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत असताना अचानक पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून खुटसावरी वासीयांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
जवळपास १,२०० लोकसंख्येच्या या गावात पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथील ग्रामपंचायत शेजारी असलेल्या बोअरवेलमधील पाणी जलकुंभात जात असते. या जलकुंभातून नळधारकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गत सात वर्षांपासून येथील नळधारकांना दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई असली तरी खुटसावरीवासीयांना पाणीपुरवठा मात्र सुरळीत केला जातो. गावात जलस्त्रोताचे अनेक साधने आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल वगळता बहुतांश जलस्त्रोतातील जलसाठा अल्प आहे. अनेक विहिरी व बोरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. सात वर्षापुर्वी गावात नळयोजना नव्हती. तेव्हा प्रत्येक घरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादली असायची. मात्र गत सात वर्षापासून गावातील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून खुटसावरीतील अनेक कुटूंबांना नळयोजनेव्दारे मुबलक पाणी दिले जात आहे. मात्र, गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आला. त्यामुळे गावकऱ्यावंर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान गावात सुस्थितीत असलेल्या एकदोन हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी वाढली असून तंटे सुरू झाले आहेत. बोअरवेलवरील गर्दी पाहून अनेक नागरीक दोन, तीन किमी अंतरावर असलेल्या शेतातील स्त्रोतातून बैलबंडीने पाण्याची वाहतूक करीत आहे. आज सकाळपासून महिलांसह बालगोपाल पाण्यासाठी शेतातील विहिरींकडे धाव घेत होत. (नगर प्रतिनिधी)