अर्जुनी-मोरगाव तालुक्याला आज मिळाले १,१०० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST2021-04-13T04:33:54+5:302021-04-13T04:33:54+5:30
नवेगावबांध : गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्यामुळे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात ...

अर्जुनी-मोरगाव तालुक्याला आज मिळाले १,१०० डोस
नवेगावबांध : गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्यामुळे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लसीकरण बंद होते. त्यामुळे नागरिकांची फारच निराशा झाली होती. अशात शनिवारी (दि.१०) कोव्हॅक्सिन लसीच्या ११०० डोसेसचा तालुक्याला पुरवठा करण्यात आला आहे.
तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २०० डोस, तर २ प्राथमिक आरोग्य केंद्रांना १५० डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी दिली आहे. प्रत्येक उपकेंद्रात नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लस पोहोचताच, आशा कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना लस आल्याची माहिती देताच, लसीकरणासाठी शेकडो महिला-पुरुषांची एकच झुंबड उडाली. नागरिक स्वतःच्या आरोग्यविषयक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कसे जागरूक होत आहेत, याचा प्रत्यय या लसीकरण केंद्रांवर आला.
त्यानंतर येथील ८० नागरिकांना लस देण्यात आली आहे. या केंद्रावर आतापर्यंत १९० नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा नाकाडे यांनी दिली आहे.
लसीकरण कार्याला सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. शुभांगी बोरकर, आरोग्यसेवक विजय जांभुळकर, अनिल बांते, आरोग्यसेविका माया नागपुरे, दुर्गा मांढरे, कल्याणी बोरकर, आशा कार्यकर्ता प्रदीपा बडोले, शुभांगी बोळनकर, हेमलता सांगोळकर, मदतनीस आशा ईसकापे यांनी सहकार्य केले.
मात्र, फक्त ८० डोस मिळाल्यामुळे शेकडो नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले. त्याबरोबरच जवळील ग्राम चान्ना-बाकटी आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत चान्ना, भिवखिडकी व बोंडगावदेवी या केंद्रांवर एकूण २०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी-डोंगरवार यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे अंतर्गत नवेगावबांध व मुंगली या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रावर १५० नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी दिली आहे.