‘आर्द्रा’ बरसला; शेतकरी सुखावला
By Admin | Updated: June 21, 2015 00:50 IST2015-06-21T00:50:23+5:302015-06-21T00:50:23+5:30
आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला.

‘आर्द्रा’ बरसला; शेतकरी सुखावला
जोमात पेरण्या सुरु : बळीराजाची निसर्गावर भिस्त, बियाणे खरेदीसाठी धावपळ
सासरा : आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला. यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला जोमाने लागल्याचे दिसत आहे.
रोहिणी नक्षत्राची सुरुवात २५ मे पासून झाली. रोहिणी नक्षत्रपासून एकूण नऊ नक्षत्रे पावसाची समजल्या जातात. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडा गेला. ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. रोहिणी नक्षत्र बऱ्याच वेळा कोरडा जात असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. मृगात पाऊस पडतो, याची खात्री शेतकऱ्यांना असते. कित्येक वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन शेतकरी वर्ग मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसाची अर्थात मृगसरींची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. यावर्षी शेतकऱ्यांना जवळपास नऊ दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती.
सध्या मृग बरसला. प्रत्येक नक्षत्र १५ दिवसांचा माणल्या जातो. मृग नक्षत्राला आज १२ दिवस झाले. येत्या २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रांरभ होत आहे. आर्द्रा नक्षत्राच्या पूर्व संध्येला मृग बरसला अन् शेतकरी वर्ग अंतर्मनातून सुखावला व पेरणीच्या कामाला लागला आहे. शेतकऱ्यांचे सुखावणे सदोदित टिकून राहिल का? या प्रश्नाचे उत्तर निसर्गालाच माहित आहे, यात शंकाच नाही.
दरवर्षी शेतकरीवर्ग अस्मानी आणि सुल्तानी संकटाने जर्जर होतांना दिसतो. प्रत्येक वेळेला यंदा चांगला पाऊस पडेल. भरपूर उत्पन्न मिळेल. दु:ख दारिद्रय दूर होतील. कर्जाचा डोंगर ओसरेल, कुटूंबात सुख, शांती, समाधान लाभेल अशा आशेत शेतकरी वर्ग असतो. बऱ्याच वेळा अवर्षण आणि अतिवृष्टीला बळी पडण्याचा अनुभव त्यांना आला आहे. कित्येकवेळा पिकावरील रोगराईने हतबल झालेला शेतकरी वर्ग दिसला. यंदा तरी शेतीतून सुख शांती समाधान मिळेल का, या प्रश्नाने शेतकरी वर्ग धास्तावल्याचे दिसत आहे. सध्या तरी मृगाच्या बरसण्याने शेतकरी सुखावला आहे. महागडे बियाणे पेरुन भरघोष उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे. (वार्ताहर)
पीक विमासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत
भंडारा : अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये यावर्षीसुध्दा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना खरीप २०१५ साठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै असून शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भोयर यांनी केले आहे.
या योजनेत भात, उडीद, मूग, तुळ, सोयाबीन, कांदा, ऊस, आडसाली, ऊस पूर्व हंगामी, ऊस सुरु, ऊस पूर्वा आदी पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रासाठी नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधता येईल.