मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप
By Admin | Updated: February 9, 2015 23:06 IST2015-02-09T23:06:29+5:302015-02-09T23:06:29+5:30
मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी

मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप
रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)
मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला आहे. अशाप्रकारे ठराव घेणारी सिंदपुरी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पाहिली ग्रामपंचयत ठरली आहे.
ग्रामसभेत यासंदर्भात गावकऱ्यांनी निर्णय घेत गावात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गावातच वास्तव्य करण्याचा ठराव पारित केला आहे. शासकीय कर्मचारी गावात अर्थात मुख्यालयी वास्तव्य न करता बाहेरगावाहून येतात. गावातील काही घरमालकांना आमिषाचा आधार घेत, हमीपत्र गोळा करीत आहेत. शासनाचे घरभाडे भत्त्याची उचल करण्यासाठी बोगस दस्तऐवजाचा आधार घेऊन निधी लाटतात. सामान्य नागरिकाने चोरी केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते. परंतु कर्मचारी शिक्षित असतानासुद्धा शासकीय निधीचा खुलेआम अपव्यय होत आहे. यात घरमालक सहकार्य करीत आहेत. यामुळे कर्मचारी आणि घर मालकावर फौजदारी कारवाईकरिता पुढाकार घेण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला आहे. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ४७ गावे आहेत. या परिसरात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, कृषी विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, पोलीस ठाणे, बँक तथा अन्य विभागाचे कार्यालय आहेत. या विभागाच्या सर्व कार्यालयात अंदाजे ६३० कर्मचारी कार्यरत आहेत. बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी मुख्यालयात वास्तव्य करीत आहे.
बहुतांश कर्मचारी गावात वास्तव्य करीत नसून सिहोरा, तुमसर आणि भंडारा या शहरात वास्तव्य करून अपडाऊन करीत आहे. हे कर्मचारी महिन्याकाठी १५०० रूपये घरभाडे भत्ता घेत आहेत. यामुळे महिन्याकाठी अंदाजे ९ लक्ष ४५ हजार रूपयाची उचल करण्यात येत आहेत. वर्षाला १ कोटी १३ लक्ष ४० हजार रूपयाला चुना लावण्यात येत आहेत. मुख्यालयात वास्तव्य करण्याचे कर्मचाऱ्यांना अनेक फर्माण देण्यात आले आहेत. परंतु खुद्द अधिकारी या आदेशाचे पालन करीत नसल्याने अधिनस्थ कर्मचारी ऐकत नाहीत. बोगस वास्तव्य दाखवून शासकीय तिजोरीची लुट करणारा आकडा चक्रावून सोडणारा आहे. या कर्मचाऱ्यावर कारवाईची धडक मोहिम आजवर राबविण्यात आली नाही. दरम्यान शासकीय कार्यालयात साहित्य चोरी झाल्यास पोलीस प्रशासन चोराला पिंजून काढत आहेत. परंतू मुख्यालयात वास्तव्य न करता कर्मचाऱ्यांना अभय मिळत आहे.