स्वातंत्र्योत्तर काळात १९५२ मध्ये लाखांदूर शहरात नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काही निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, सदर बांधकामाला तब्बल ७० वर्षे लोटल्याने या इमारत व निवासस्थान दुरुस्तीवर दरवर्षी शासनाला लाखो रुपयांचा निधी खर्च करावा लागत होता.
दरम्यान, सदर निधी खर्च करून तात्पुरती दुरुस्ती होत असतानाच इमारत मोडकळीस व जीर्ण अवस्थेत आल्याने गत काही वर्षांपासून या इमारतीसह निवासस्थान बांधकामाची मागणी पोलीस प्रशासनासह जनतेत केली जात होती. सदर मागणीची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत राज्याच्या पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे बांधकाम मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
त्यानुसार काही महिन्यांपूर्वी राज्याच्या पोलीस गृहनिर्माण महामंडळ अंतर्गत लाखांदुरात पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासी सोयीसाठी एकूण ६४ निवासस्थानांचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. सदर मंजुरी अंतर्गत या बांधकामाला येत्या काही महिन्यांत प्रारंभ केले जाणार असून बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक मंजुरीसाठी प्रशासन स्तरावर वेगाने कार्यवाही केली जात आहे.