रेती चोरी पकडण्यासाठी पोलीस पाटलांची नियुक्ती
By Admin | Updated: December 30, 2016 01:57 IST2016-12-30T01:57:23+5:302016-12-30T01:57:23+5:30
रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केल्या जाते. ही बाब सामान्य

रेती चोरी पकडण्यासाठी पोलीस पाटलांची नियुक्ती
महसूल विभागाचा अफलातून प्रकार : कमी मानधनात अधिक कामे
पवनी : रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक केल्या जाते. ही बाब सामान्य माणसापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. त्यावर आळा घालणे, वरिष्ठांना अवघड झाले आहे. अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गावातील कोतवाल व पोलीस पाटील यांना नियुक्त करून महसूल विभागाने अफलातून प्रकार सुरु केलेला आहे. क्षमतेपलिकडे काम देऊन मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर अन्याय केला जात आहे.
कोट्यवधीची उलाढाल असलेल्या रेतीघाटावरून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु असतो. रेतीघाटावरून अवैध वाहतूक करून रेतीचा व्यवसाय करून रेतीघाटासाठी गुंतवलेली रक्कम किमान दुप्पट करणे ही रेती कंत्राटदारांचे ध्येय असल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकारी व चेकपोष्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मॅनज केल्याचे कंत्राटदार उघड उघड बोलत असतात. असे असताना ३००० रुपये मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल व पोलीस पाटलांना चेक पोस्टवर नियुक्त करून काय साध्य होणार आहे हे न समजणारे कोडे आहे.
भोजापूर येथील चेकपोष्टवर तीन पाळीमध्ये नऊ जण कार्यरत आहेत. वन्यप्राण्यांची भीती असलेल्या शेळी, सोमनाळा, खातखेडा, सिरसाळा, कन्हाळगाव, ढोरप, चांदी, कोदुर्ली, भोजापूर व सावरला गावातील कोतवाल व पोलीस पाटील यांची नियुक्ती वाहनाची तपासणी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. मानधनावर काम करणारे पोलीस पाटील तज्ज्ञ नाहीत. त्यांना संरक्षण नाही. त्यांच्याकडे शस्त्र नाहीत. अशावेळी वन्यप्राणी व ट्रक चालक यांचेपासून त्यांच्या जीवाला धोका असताना कशी जबाबदारी देऊन मानसिक छळ केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
५० हजारांची वसुली
४रॉयल्टीशिवाय ट्रक घेवून जाताना एक ट्रक ड्रायव्हर पवनी येथील तपासणी नाक्यावर ५०० रु. टीप देत असतो. तरच त्याचा ट्रक तपासणी शिवाय बाहेर पडतो. दर दिवसाला नाक्यावर साधारणत: ५० हजार रुपये अवैधरित्या जमा होत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर या व्यवसायातून बाहेर पडलेल्या कंत्राटदाराने दिली.