रेलयात्री सेवा समितीचे प्रफुल पटेल यांना निवेदन
By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:32:04+5:302016-06-07T07:32:04+5:30
रेलयात्री सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन समितीच्या वतीने रेल्वे समस्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले.

रेलयात्री सेवा समितीचे प्रफुल पटेल यांना निवेदन
भंडारा : रेलयात्री सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन समितीच्या वतीने रेल्वे समस्यासंबंधी मागण्यांचे निवेदन दिले.
भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर गीतांजली व आझाद हिंद एक्स्प्रेसचा थांबा, तुमसर येथे काही जलद गाड्यांचे थांबे, नागरिकांच्या सोयीसाठी भंडारा शहरात तिकीट आरक्षणाची सोय, रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीस चौकीची स्थापना त्यांच्या पुढाकाराने व संस्थेच्या प्रयत्नाने झाली.
भंडारा शहर शटल ट्रेनची समितीची मागणीची दखल घेत त्यांनी भंडारा येथे आपल्या उपस्थितीत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व समिती पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून केली होती. त्यानंतर भंडारा ते भंडारा रोड शटल ट्रेनसाठी रेल्वे लाईनची तीनदा तांत्रिक तपासणी करण्यात आली होती.
यासाठी त्यावेळी २२ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात येऊन १९ कोटी ८५ लक्ष रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. परंतु तो मान्य झाला नव्हता. परंतु प्रस्ताव पुन्हा पाठविल्यास विचार करण्यास येईल, असे रेल्वे बोर्डाने म्हटले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. समितीने यासंबंधी रेल्वेमंत्री जनप्रतिनिधी व रेल्वे बोर्ड, यांच्याकडे सातत्याने शटल ट्रेनची मागणी उचलून धरली. परंतू रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधींच्या निरंतर उपेक्षेमुळे पुढे सरकले नाही.
शटल ट्रेनचा प्रश्न अधांतरीच आहे. भंडारा येथे २६ जलद गती गाड्यांचे थांबे नाहीत. बिलासपूर-पुणे व इतर काही गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी प्रफुल पटेल यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. विद्यमान खासदारांकडेही निवेदने देण्यात आली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन खासदाराच्या कारकिर्दीत बिलासपूर-पुणेचा थांबाही मिळू नये व १५ लक्ष लोकसंख्या व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहराला काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळाले नसल्याची खंत रेल्वे यात्रा समितीने यावेळी खासदार पटेल यांच्याजवळ व्यक्त केली. यावेळी रमेश सुपारे, वरियलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)