दुसऱ्याही अहवालात रोजगारसेवक दोषी
By Admin | Updated: October 5, 2015 01:02 IST2015-10-05T01:02:35+5:302015-10-05T01:02:35+5:30
कान्हळगाव येथे पांदन रस्ता व नाला सरळीकरणाचे काम कागदोपत्री पूर्ण केल्याची तक्रार करण्यात आली.

दुसऱ्याही अहवालात रोजगारसेवक दोषी
रक्कम वसुलीचे निर्देश : पदावरुन कमी करण्याची शिफारस
मोहाडी : कान्हळगाव येथे पांदन रस्ता व नाला सरळीकरणाचे काम कागदोपत्री पूर्ण केल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची दोनदा चौकशी करण्यात आली. यात ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचे स्पष्ट झाले. रोजगार सेवकाला कामावरुन कमी करून रक्कम वसूल करण्याचे निर्देश चौकशी अधिकऱ्यांनी दिले आहे.
कान्हळगाव सिरसोली येथील पांदन रस्ता व नाला सरळीकरणाच्या कामाचे बनावट मजुरीपत्रक, मोजमाप पुस्तीका तयार करण्यात आली. त्या आधारे विशिष्ट मजुरांच्या नावावर रक्कम जमा झाली. ती रक्कम ग्राम रोजगार सेवकाने परस्पर उचलली. ही बाब उघडकीस आली. आॅनलाईन प्रणालीमुळे बनावट कामाचे बिंग फुटले. या बनावट कामाचे सर्व पुरावे तक्रारकर्ता राजेंद्र मसर्के यांनी जमा केले. यामुळे मोहाडी पंचायत समितीत खळबळ उडाली. एवढे होवूनही पंचायत विस्तार अधिकारी यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. पण तक्रारकर्त्याने मंत्रालयात तक्रार केली.
वरिष्ठांचे निर्देश मिळताच विस्तार अधिकारी (पंचायत) कुंभरे यांनी चौकशी केली. मात्र, त्याचा अहवालाला विलंब लावला. याबाबत 'लोकमत'ने हे प्रकरण लावून धरले. यामुळे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी अहवाल तयार केला. यात ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
कान्हळगाव (सिरसोली) येथील रोजगार हमी योजनेच्या बनावट कामाची तक्रार मंत्रालयापर्यंत गेल्यामुळे तक्रार निवारण प्राधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी दुसऱ्यांदा संबंधिताला नोटीस बजावून भंडारा येथे प्रत्यक्ष बोलावले. माजी सरपंच अनूप उटाणे, तांत्रिक पॅनल अधिकारी गिरीश झंझाड, सुरेशकुमार भैरम, ग्रामसेवक सुनिल ब्राम्हणकर, ग्रामरोजगारसेवक मुलेश्वर कुथे, जीवन झंझाड, नरेश चवळे, तक्रारकर्ता राजेंद्र मसर्के, मजूर निलकंठ चवळे यांचे बयान घेण्यात आले. तक्रार निवारण प्राधिकारी अधिकाऱ्याने चौकशी अहवाल पारीत केला. तसेच आदेश तयार केला. या प्रकरणात ग्रामरोजगार सेवक मुलेश्वर कुथे याला दोषी ठरविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)