अंनिस महिला शोषणमुक्तीची चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 00:34 IST2016-01-13T00:34:47+5:302016-01-13T00:34:47+5:30
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. परंतु आजही स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले जाते.

अंनिस महिला शोषणमुक्तीची चळवळ
सविता शेटे यांचे प्रतिपादन : स्त्री-पुरुष समता प्रबोधन मेळावा
भंडारा : भारतीय संविधानाने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. परंतु आजही स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवले जाते. धर्माच्या, परंपरेच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण केले जात आहे. अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही स्त्रियांच्या शोषण मुक्तीची चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य सविता शेटे यांनी केले.
भंडारा येथे आयोजित स्त्री-पुरुष समता प्रबोधन अभियानांतर्गत आयोजित संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा राज्य महिला विभागातर्फे आयोजित स्त्री-पुरुष समता प्रबोधन अभियानांतर्गत लिंगभेदाला नकार, संविधानाचा स्वीकार या विषयावर संवाद मेळाव्याचे आयोजन रेवाबेन पटेल महिला महाविद्यालयात करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रेवाबेन पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जुल्फी शेख या होत्या. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला राज्य कार्यवाह प्राचार्य सविता शेटे, सामाजिक कार्यकर्ता शैल जैमिनी, आपादग्रस्त महिला सहाय्यता केंद्रप्रमुख मृणाल मुनीश्वर, प्रा.नरेश आंबीलकर, महिला अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य विजया पाटील, गजेंद्र सुरकार, संजय शेंडे, विष्णुदास लोणारे, हर्षल मेश्राम, त्रिवेणी वासनिक उपस्थित होते.
समाजातील या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणारे डॉ.नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, साहित्यिक कलबुर्गी यांना गोळ्या घालून मारले गेले. महात्मा फुले, सावित्रीबाई यांचा वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्रातील महिलांनीही आपले जगणे स्वत:पुरते वैयक्तिक न ठेवता धर्माची विधायक चिकित्सा करणाऱ्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. संचालन प्रा.श्वेता वेगड यांनी तर आभार प्रा.वर्षा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थिनी, प्राध्यापक, ज.मु. पटेल महाविद्यालयाचे रासेयोचे विद्यार्थी, रेवाबेन पटेल महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, महिला बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमोद येल्लजवार, बासप्पा फाये, अश्विनी भिवगडे, बळीराम सार्वे, पुरुषोत्तम कांबळे, कविता लोणारे, प्रा.चव्हाण, प्रा.चांदेकर, प्रा.रुद्र, प्रा.शाह, माधुरी वंजारी, प्रा.पाखमोडे, प्रा. नखाते, प्रा.ईश्वरकर, प्रा.बोरकर, प्रा.कन्नाके, डॉ.श्रृंगारपुरे आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)