वीज वितरण कार्यालयावर संतप्त ग्रामस्थांचा हल्लाबोल
By Admin | Updated: October 11, 2014 22:58 IST2014-10-11T22:58:47+5:302014-10-11T22:58:47+5:30
वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज

वीज वितरण कार्यालयावर संतप्त ग्रामस्थांचा हल्लाबोल
उद्रेक भारनियमनाचा : सावरीत तोडफोड, लाखांदुरात आक्रोश
जवाहरनगर/लाखांदूर : वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल केला. सावरी येथे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारला विद्युत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात नागरिकांविरूध्द जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पेंच पाटबंधारे प्रकल्पांतर्गत खरबी (नाका) परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कालव्यांची दैनावस्था, नहरात झुडपे वाढल्याने पाण्याचा पुरवठा होत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे विहिरीवर व नाल्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात येते मात्र सावरी, इंदिरानगर, राजेदहेगाव, खराडी, खरबी, परसोडी, नांदोरा या परिसरात आठ तास भारनियमनामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. विद्युत विभाग व पाटबंधारे विभागाला सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी संतप्त नागरिकांनी सकाळी १० वाजता सावरी येथील विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यावेळी शाखा अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी टेबलावरील कागदपत्र खाली फेकून खुर्च्यांची व दर्शनी फलकाची तोडफोड केली.
आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांचा हल्लाबोल
लाखांदूर : दिवसाचे भारनियमन व रात्रपाळीत केल्यामुळे वैतागलेल्या आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री लाखांदूर विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला.
संपूर्ण चौरास भागात धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कृषी पंपाचीही संख्या सर्वाधिक आहे. धानपीक अंतिम टप्प्यात असताना विद्युत विभागाने भारनियमन सुरू केले आहे. दिवसाचे भारनियमन करुन रात्री १२ वाजेनंतर केवळ सहा तास विद्युत पुरवठा पुरविण्याचा निर्णय घेतल्याने हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी विद्युत विभागाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कार्यालयावर हल्लाबोल केला. दिवसा कृषी पंपाचे भारनियमनाचे कारण सांगून बंद केला जातो. ऐन धान गर्भात असताना रात्री १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केवळ सहा तासाकरिता सुरु केला जातो. पिकाला पाणी देण्यासाठी हा वेळ अत्यल्प असल्याने चौरास भागातील धानपिक धोक्यात आले आहे. आसोला व आथली येथील शेतकऱ्यांनी भारनियमनाला कंटाळून अधिकाऱ्यांना घेराव करण्यासाठी तयारी केली होती. कनिष्ठ अभियंता देवगडे व वरिष्ठ अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, भारनियमन बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली.
(वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)