मानधनाअभावी अंगणवाडी कर्मचारी संकटात
By Admin | Updated: May 18, 2015 00:30 IST2015-05-18T00:30:06+5:302015-05-18T00:30:06+5:30
शिक्षण, आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या चिमुकल्यांच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन रखडले आहे.

मानधनाअभावी अंगणवाडी कर्मचारी संकटात
भंडारा : शिक्षण, आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या चिमुकल्यांच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन रखडले आहे. मागील तीन महिन्यांपासून त्यांचे मानधन काढण्यात आले नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आधीच हलाखीची परिस्थिती आहे. त्यात तीन महिने मानधनाला विलंब होत आहे. सध्या लग्नसराईची वेळ, महागाईची झळ यामुळे त्यांच्या दैनंदिन जिवनावर याचा परिणाम झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाने अंगणवाड्यांची निर्मिती झाली. यातून समाजाला शिक्षण-आरोग्याला मदत झाली. शिक्षणाबरोबर पोटाची भूक शांत झाल्याने कुपोषण टळले. सुदृढ समाजनिर्मितीला आधार मिळाला. मात्र, या उपक्रमासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे वाढत्या महागाईत संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत इतरही कर्मचाऱ्यांचे पगार दोन तीन महिन्यापासून शासनाकडे थकित आहेत. मानधन मिळावे यासाठी अनेकदा कर्मचाऱ्यांनी निवेदने दिली. धरणे आंदोलनही केली. मात्र त्यांना अधिकाऱ्यानी केवळ आश्वासन दिली.
आजही कर्मचाऱ्याना नियमित मासिक मानधनअभावी उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे व्यापारी-बाजारपेठ सुस्त जाणवत आहे. तेव्हा नियमित मानधन वाटप करण्याची मागणी आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता येथील अधिकाऱ्यांनी शासनाकडूनच मानधन प्राप्त झाले नाही. आम्ही कुठून देणार शासनाने निधी पाठविल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येईल. (वार्ताहर)
गणवेशासाठी तगादा
एकीकडे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन रखडले असतानाच दुसरीकडे त्यांच्या गणवेशासाठी ४०० रुपयाचा तगादा लावण्यात येत आहे. मागील वर्षी त्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून २०० रुपये प्रति गणवेश मिळाले होते. मात्र यावर्षी त्यांच्याकडून ४०० रुपयांची मागणी करण्यात येत आहे.