अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन
By Admin | Updated: March 21, 2017 00:26 IST2017-03-21T00:26:29+5:302017-03-21T00:26:29+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या न सुटल्याने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून ४८ तासांपर्यंत मुक्कामी आक्रोश आंदोलन सुरु केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन
१ एप्रिलपासून बेमुदत संप : कर्मचारी युनियनचा निर्णय
भंडारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या न सुटल्याने संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून ४८ तासांपर्यंत मुक्कामी आक्रोश आंदोलन सुरु केले आहे. येथील त्रिमूर्ती चौकात सुरु असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे हिवराज उके करीत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन पुर्ण केलेले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समितीने ठरविल्या प्रमाणे मानधनात वाढ झाली पाहिजे, सेवानिवृत्ती लाभ मिळाला पाहिजे. यात सेविकेला दोन लाख व मदतनिसला १.५० लक्ष रुपयांचा लाभ मिळाला पाहिजे, शालेय शिक्षकांप्रमाणे उन्हाळी रजा लागू करा व आजारपणाच्या रजा लागू करा आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान आज सोमवारी दुपारी १२ वाजतापासून शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्रिमुर्ती चौकात आक्रोश आंदोलन सुरु केले.
आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे व युनियनचे कार्याध्यक्ष हिवराज उके, सविता लुटे यांनी केले. यावेळी युनियनच्या अल्का बोरकर, मंगला गजभिये, रिता लोखंडे, मंगला रामटेके, गौतमी मंडपे, शमीम बानो खान, मंगला गभणे, रेखा टेंभुर्णे, सुनंदा बडवाईक, छाया क्षिरसागर यांच्यासह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित आहेत.
३० मार्चपर्यंत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल अशी सुचनाही यावेळी शासन व प्रशासनाला देण्यात आली. पांडेचरी येथे अंगणवाडी सेविकेला दरमहा १९४८० तर मदतनीसला १३३३० रुपये मानधन दिले जाते. याचप्रमाणे गोवा राज्यात अनुक्रमे १६२००, ९०००, तेलंगणा राज्यात १०१०० व मदतनीसांना ६००० रुपये मानधन दिले जात आहे.
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानधन मिळाले पाहिजे अशी मागणीही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ने केली आहे. (प्रतिनिधी)