लाखनी येथील अंगणवाडी क्रमांक सहा समस्येच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:33+5:302021-07-15T04:24:33+5:30
लाखनी : शहरातील गुजरी चौक येथील नगर पंचायत हद्दीत येणाऱ्या अंगणवाडी क्र. ६ची ...

लाखनी येथील अंगणवाडी क्रमांक सहा समस्येच्या गर्तेत
लाखनी : शहरातील गुजरी चौक येथील नगर पंचायत हद्दीत येणाऱ्या अंगणवाडी क्र. ६ची ५ जुलै २०२१ला रात्री चोरी झाली. या चोरीमध्ये अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषण आहाराची चोरांनी नासधूस केली आणि चोरी करताना चोरांनी अंगणवाडीचे दार तोडले. यामध्ये दाराचे मोठे नुकसान झाले. आज या चोरीला १० दिवस झाले आहेत. इतका सर्व प्रकार होऊनसुद्धा एखादा अधिकारी या ठिकाणी भटकलेला नाही. पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे. पोलीस अधिकारी येऊन त्यांनी परिसराची पाहणी केली. आता तर दार तुटलेल्या ठिकाणी टिनाची पाटी लावलेली आहे.
अंगणवाडीमार्फत शासन विविध योजना राबवत असते. यामध्ये विटॅमीनचे डोस लहान मुलांना देणे, गर्भवती महिलांची तपासणी, सहा वर्षांखालील मुलांना पोषण आहार देणे, लहान मुलांच्या आहारात होणाऱ्या बदलाबाबत पालकांना मार्गदर्शन करणे, असे बरेचसे काम अंगणवाडीसेविका अंगणवाडीतून करीत असतात. पण म्हणतात न दिव्याखाली अंधार, असाच प्रकार अंगणवाडीच्या बाबतीत होत आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता "त्यांचे ते पाहवं" अशी अरेरावीची उत्तरे मिळतात.
अंगणवाडी सेविकेला ३, ४ महिने मानधन नसते, त्यात त्यांचे मानधन हे फार कमी आहे. असे असताना एखाद्या अंगणवाडी सेविकेला त्यांच्या मानधनाच्या रकमेतून दरवाजा करायला लावणे कितपत योग्य आहे. १० दिवस लोटूनही कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात गांभीर्य दाखवले नाही. म्हणूनच, "त्या अंगणवाडीचा वाली कोण?" असे म्हणायला हरकत नाही.